'टीएमटी'ला 'बेस्ट'सोबतची 'सेकंड इनिंग' तारणार

तोट्यात असणाऱ्या टीएमटीला बेस्टने मदतीचा हात दिला आहे. जर राजकीय विघ्न आलं नाही, तर टीएमटी आणि बेस्ट मिळून संसार करणार आहेत. यामुळे टीएमटीच्या जीवनात सेकंड इनिंग सुरू होणार आहे.

Updated: Jul 16, 2014, 09:08 PM IST
'टीएमटी'ला 'बेस्ट'सोबतची 'सेकंड इनिंग' तारणार title=

मुंबई : तोट्यात असणाऱ्या टीएमटीला बेस्टने मदतीचा हात दिला आहे. जर राजकीय विघ्न आलं नाही, तर टीएमटी आणि बेस्ट मिळून संसार करणार आहेत. यामुळे टीएमटीच्या जीवनात सेकंड इनिंग सुरू होणार आहे.

दरवर्षी ठाणे महापालिकेकडून २५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य घेऊनही वर्षाला २५ कोटींचा तोटा करणाऱ्या 'टीएमटी'ला छत्रछायेखाली घेण्यास बेस्ट प्रशासनाने अनुकूलता दर्शवली आहे. 

ठाणे पालिकेने त्यास सहमती दर्शवली तर 'टीएमटी'चाही प्रवास 'बेस्ट' होऊन ठाणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

'टीएमटी'चे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असले तरी गेली २५ वर्षे या 'खटारा' सेवेने ठाणेकरांच्या सहनशिलतेचा अंत पाहिलेला आहे. सक्षमीकरणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केल्यानंतरही सुसह्य प्रवाससेवा देण्यात 'टीएमटी'ला यश आलेले नाही. 

बसची वाट बघत तासनतास तिष्ठावे लागणे. प्रत्येक बस गर्दीने ओसंडून वाहताना दिसणे. भंगार बस रस्त्यांवर बंद पडणे, असे हाल ठाणेकरांना सोसावे लागतात. 'टीएमटी'च्या ताफ्यात ३२५ बस असल्या तरी अनागोंदीमुळे २०० बसही रस्त्यावर धावत नाहीत.

 'टीएमटी'चा तोटाही दरमहा दीड ते पाऊणेदोन कोटींवर गेला आहे. स्वतः आर्थिक विवंचनेत असताना 'टीएमटी'ला पोसणे पालिकेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे 'टीएमटी' बेस्टमध्ये विलीन करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

याबाबत 'बेस्ट'चे महाव्यवस्थापक ओ.पी. गुप्ता यांच्याकडे विचारणा केली असता 'टीएमटी'ला सामवून घेण्यास तयार असल्याचे आणि त्याबाबतची प्राथमिक बोलणी ठाणे पालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्याशी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

आणखी एक-दोन वर्षे 'टीएमटी'च्या होणाऱ्या तोट्याचा भार पालिकेने उचलल्यास पुढे ही सेवा आम्ही स्वयंपूर्ण करून दाखवू, असे गुप्ता म्हणाले.

काय आहेत विलिनीकरणाचे फायदे?

'टीएमटी' कर्मचाऱ्यांनाही 'बेस्ट'च्या धर्तीवर जादा वेतन आणि इतर सोई-सुविधा मिळू शकतील.

सध्या 'बेस्ट'ला ठाण्यात सेवा देताना येत असलेल्या अडचणी दूर होतील.

'बेस्ट' समितीवर ठाण्यातील काही प्रतिनिधींचा समावेश करता येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.