सावकारचा निर्लज्जपणा, शेतकऱ्याकडे मुलगी-सुनेची मागणी...

 हडप केलेली जमीन मागायला शेतकरी गेल्यावर तुझी मुलगी आणि सून माझ्या घरी पाठव तरच तुझी जमीन देईल, अशी  तळ पायाची आग मस्तकात जाणारी मागणी सावकाराने केल्याची घटना बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात असलेल्या कारी येथे घडली. 

Updated: Jul 5, 2016, 04:59 PM IST
सावकारचा निर्लज्जपणा, शेतकऱ्याकडे मुलगी-सुनेची मागणी... title=

बीड :  हडप केलेली जमीन मागायला शेतकरी गेल्यावर तुझी मुलगी आणि सून माझ्या घरी पाठव तरच तुझी जमीन देईल, अशी  तळ पायाची आग मस्तकात जाणारी मागणी सावकाराने केल्याची घटना बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात असलेल्या कारी येथे घडली. 

कर्ज परत केले पण...

शेतकऱ्याने आपल्या मुलीचे सावकराकडे शेती गहाण ठेऊन केले. त्यानंतर काबाड कष्ट करून मुद्दल आणि व्याजाची रक्कम परतफेड केली.  तरीही सावकाराने जमीन हडप केली. आपली जमीन परत मागण्यासाठी शेतकरी सावकाराकडे गेला असता  व्यवहार संपुष्टात आणायचा असेल तर तुझी मुलगी आणि सून माझ्याकडे पाठवून दे, अशी धक्कादायक मागणी केली.  

महिला आयोगाने घेतली दखल

या धक्कादायक प्रकाराची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून बीडच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून अहवाल मागवला आहे. कारी येथील शेतकरी इंदर मुंडे यांनी नोव्हेंबर २००९ मध्ये मुलगी जिजाबाईच्या लग्नाचा खर्च फेडण्यासाठी गावंदराचे सरकारी सावकार भगवान बडे यांच्याकडून १ लाख ३५ हजार रुपये कर्ज घेतले. त्यासाठी त्यांनी १ एकर ३६ गुंठे बागायती शेती गहाण ठेवली. इंदरने २०१२ पर्यंत कर्जाचे मुद्दल फेडले. त्यानंतर २०१५ मध्ये व्याजही फेडले. कर्जाची व्याजासह परतफेड झाल्यामुळे गहाणखत रद्द करून शेती मला परत द्या, अशी मागणी त्यांनी सावकाराकडे केली. 

किती आहे शेतीचा भाव...

शेती परत देतो म्हणून त्याने एप्रिल २०१६ मध्ये कोऱ्या बाँडवर इंदरच्या सह्या घेऊन शेती हडप केली. या शेतीचा भाव १० लाख रुपये एकर आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन

इंदरने सावकाराकडे तगादा लावल्यावर त्याने त्यांच्याकडे आणखी ५० हजार रुपये मागितले. शिवाय तुझी मुलगी आणि सून माझ्याकडे पाठवून दे, अशी मागणीही केली. दरम्यान, सावकाराकडून होत असलेली पिळवणूक आणि मुलगी- सुनेची मागणी याबाबतची माहिती इंदर मुंडेंनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिली आहे. 

आमरण उपोषण..

सावकाराच्या या मागणीची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी गंभीर दखल घेतली असून पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडून कारवाईचा अहवाल मागवला आहे.आता हा शेतकरी शेती परत मिळवण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषणाला बसला आहे.

इच्छामरण द्या

जमीन परत द्या, या मागणीसाठी चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मात्र, प्रशासनाने दखल न घेतल्याने मला कुटुंबियांसह इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी इंदर मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे.