'आम्ही सारे पानसरे...' एक ठिणगी पेटलेली!

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांचं शुक्रवारी रात्री मुंबईत निधन झालं. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दीड वर्ष पूर्ण होत असतानाच, मारेक-यांच्या गोळीनं पानसरेंचाही बळी जावा, हा दुर्दैवी योगायोगच म्हणावा लागेल.

Updated: Feb 21, 2015, 08:09 PM IST
'आम्ही सारे पानसरे...' एक ठिणगी पेटलेली!  title=

कोल्हापूर : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांचं शुक्रवारी रात्री मुंबईत निधन झालं. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दीड वर्ष पूर्ण होत असतानाच, मारेक-यांच्या गोळीनं पानसरेंचाही बळी जावा, हा दुर्दैवी योगायोगच म्हणावा लागेल.

एक झुंज संपली... एका लढवय्या कॉम्रेडची दुर्दैवी अखेर झाली... आयुष्यभर विवेकानं विचारांची लढाई लढणाऱ्या गोविंदराव पानसरेंचा मारेकऱ्यांच्या गोळ्यांनी बळी घेतला... गेल्या सोमवारी कोल्हापुरात पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर दोघा अज्ञात व्यक्तींनी अगदी जवळून गोळ्या झाडल्या. तब्बल पाच दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. उपचारांसाठी त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र, शेवटी काळानंच डाव साधला.
 
पुरोगामी चळवळीचा खंदा आधारस्तंभच हरपल्यानं पुरोगामी महाराष्ट्र शोकसागरात बुडाला... पानसरेंच्या कर्मभूमीत कोल्हापुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी पंचगंगेच्या काठी अश्रूंचा महापूर दाटून आला. 

गोरगरीब, कष्टकऱ्यांचे अण्णा त्यांना कायमचे सोडून गेले. यावेळी कार्यकर्त्यांच्या एका डोळ्यात आसू होते... तर दुस-या डोळ्यात दिसली ती सरकारबद्दलची तीव्र चीड...

दीड वर्ष उलटली तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी अजून सरकारला सापडलेले नाहीत. आता पानसरेंचाही दाभोलकर झाला... सरकार नावाची व्यवस्थाच कशी कोलमडून पडलीय, याची कबुलीच गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दिली. 
 
 दाभोलकर गेले... पानसरेही गेले... आता पुढं काय, अशी चिंता लागून राहिलीय.. पण अण्णांच्याच चितेतूनच संघर्षाची नवी ठिणगी पेटलीय. 
 
धगधगते अग्निकुंड असलेले कॉम्रेड गेले... पण 'आम्ही सारे पानसरे' हा ज्वलंत विचार चेतवून गेले... मारेक-यांनो, तुमच्या गोळ्या संपतील, पण चळवळ संपणार नाही... अण्णा, तुमचं बलिदान वाया जाणार नाही...
  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.