पुणे / धुळे : भाजप सरकारच्या विरोधात पुण्यात काँग्रेस आणि आपनं आंदोलनं केलं.
'वन रँक वन पेन्शन'च्या मुद्द्यावर दिल्लीत एका माजी सैनिकाने आत्महत्या केली. त्यावर भाजप सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलनं करण्यात आलं.
फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकात काँग्रेसनं आंदोलन केलं. तर, भाजपच्या पुणे शहर कार्यालयासमोर आप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना माजी जवानांच्या कुटुंबियांना भेटू दिलं. उलट त्यांना ताब्यात घेतलं. याचाही जोरदर निषेध काँग्रेस आणि आपच्या वतीनं करण्यात आला.
काँग्रेच खासदार आणि काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धुळे जिल्हा शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवनसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
माजी सैनिकाच्या आत्महत्येचे भाजप सरकार आणि मोदी हे राजकारण करत असून भाजप सरकारने योग्य निर्णय वेळीच न घेतल्याने देशात माजी सैनिक आत्महत्या करीत आहेत, असं मत व्यक्त करत काँग्रेस भवनसमोर खासदार राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकार याविरोधात जोरदार घोषणाबाजी ही केली.