नवी मुंबईत सुडाचे राजकीय राजकारण, तुकाराम मुंढे यांना नागरिकांचा पाठिंबा

 काही राजकीय नेते आपले अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी थेट मुंढे यांना हटावसाठी एकत्र आलेत. मात्र, जनतेने त्यांना पाठिंबा दिलाय.  

Updated: Jul 21, 2016, 01:21 PM IST
नवी मुंबईत सुडाचे राजकीय राजकारण, तुकाराम मुंढे यांना नागरिकांचा पाठिंबा title=
छाया : DNA

नवी मुंबई : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या अनधिकृत बांधकामावरच्या कारवाईमुळे चर्चेत आले. काही राजकीय नेते आपले अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी थेट मुंढे यांना हटावसाठी एकत्र आलेत. मात्र, जनतेने त्यांना पाठिंबा दिलाय. नागरिकांनी ऑनलाईन याचिका दाखल केली आहे.

 मुंढे यांची अनधिकृत बांधकामांवरची धडक कारवाई आणि लोकहिताची कामं यामुळे नवी मुंबईच्या जनतेमध्ये ते लोकप्रिय आहेत. पण मुंढे यांच्या बदलीसाठी नवी मुंबईतले राजकारणी एकत्र आले आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला जातोय. 

मुख्यमंत्र्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष करुन तुकाराम मुंढे यांना तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.  त्यासाठीच नवी मुंबईतल्या नागरिकांकडून मुंढे यांच्यासाठी ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आलीय. www.change.org या वेबसाईटवर करण्यात आलेल्या ऑनलाईन याचिकेला आतापर्यंत साडे चार हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. 

आयुक्तांच्या चौकशीची घोषणा

नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या वर्तणुकीची वरिष्ठ अधिका-यामार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी केलीय. तसंच या चौकशीचा अहवाल याच अधिवेशनात सभागृहात ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. प्रशासकीय अधिका-यांनी लोकप्रतिनिधींचा सन्मान केलाच पाहिजे असं बापटांनी नमूद केले. तुकाराम मुंढेंच्या वर्तणुकीबाबतचा मुद्दा भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला होता.