यवतमाळ : मुलाच्या निधनाचे दु:ख पचवून आपल्या सूनेचा पूर्नविवाह करण्याचा पुढाकार घेताना सासऱ्यांनी सुनेच्या वडिलांची भूमिका निभावली. त्यांनी तिचे कन्यादान करून समाजात आदर्शाचा नवा पायंडा पाडला. या आदर्शाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेर तालुक्यातील चिखली कान्होबा येथील प्रकाश घावडे यांनी समाजासमोर नवा आदर्श घालून दिला. मुलगा गेल्यानंतरही दु:ख उराशी लपवून आधारहीन झालेल्या विधवा सुनेला सासऱ्य़ाने पुन्हा आधार देताना नवीन संसार थाटून दिला. 14 महिन्यांपूर्वी सासऱ्याच्या भूमिकेत असलेले घावडे यांनी सूनेच्या वडिलांची भूमिका स्वीकारली. सुनेचं कन्यादान करून आदर्श निर्णय महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेत घालून दिला.
प्रकाश आणि चंद्रकला घावडे या दाम्पत्याचा एकुलता मुलगा राजेंद्र याचा सर्पदंशाने मृत्यू झालाने प्रकाश यांची सून माला पतीशिवाय निराधार झाली. सासरे प्रकाश यांना आपल्या लाडक्या सुनेच्या आयुष्याची चिंता होती. त्यांना ती स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी सुनेचा पुनर्विवाह करणयाचं निर्णय त्यांनी घेतला आणि पत्नी चंद्रकला यांनीही त्यांना साथ दिली.
वरशोधण्यासाठी सुरुवात त्यांनी केली. चांदूर येथील पदवीधर तरुण अमोल दत्तूजी बानाईत हा मालाशी लग्न करायला तयार झाला. मंगलादेवी संस्थानमध्ये शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत माला आणि अमोलचा विवाह मोठया थाटामाटात पार पडला.
मालाला वडील नसल्याने प्रकाश घावडे यांनी लग्नपत्रिकेतही मालाच्या नावासमोर स्वत:चे नाव लावून वडील नसल्याचे दु:ख मालाला जाणवून दिले नाही. एवढेच नाही तर प्रकाश आणि चंद्रकला यांनी तीन एकर शेती मालाच्या नावे करून दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.