लातूर : शहराला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण १०० टक्के भरलं आहे. या धरणाचे ०६ दरवाजे पाव मीटरने उघडण्यात आले. मांजरा धरण उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आणि बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या सीमेवर धनेगाव इथे आहे.
गेल्या १० वर्षात पहिल्यांदाच हे धरण भरले आहे. दुष्काळामुळे कधी नव्हे ते मांजरा धरण हे गेल्या उन्हाळ्यात अक्षरशः कोरडं ठाक पडलं होतं. आता गेल्या १० दिवसाच्या पावसात मांजरा धरण भरभरून वाहत आहे. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
याशिवाय लातूर जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्प, मसलगा प्रकल्प आणि तिरु मध्यम प्रकल्पाचेही दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील मांजरा, तावरजा आणि इतरही नद्यांच्या शेजारील गावांना सतर्क राहण्याचा तसच पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही पूल ओलांडू नये असा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.
उदगीर तालुक्यातील तिरु नदीला आलेल्या पुरामुळे अतनूर येथील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अतनूर ते घोणसी या गावांचा संपर्क तुटला आहे.