लालभडक दिसते म्हणून ती काही 'मिरची' नसते!

सणा-सुदीचे दिवस जवळ आले असतानाच, याचाच गैरफायदा घेत भेसळ-युक्त मिरची पावडर बाजारात विकण्याचा प्रयत्न नागपूरच्या अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाने हाणून पाडलाय.

Updated: Sep 9, 2015, 02:36 PM IST
लालभडक दिसते म्हणून ती काही 'मिरची' नसते! title=

नागपूर : सणा-सुदीचे दिवस जवळ आले असतानाच, याचाच गैरफायदा घेत भेसळ-युक्त मिरची पावडर बाजारात विकण्याचा प्रयत्न नागपूरच्या अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाने हाणून पाडलाय.

नागपूरच्या कळमना उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेला सर्व साठा तपासणीकरता प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. 

धक्कादायक म्हणजे, वरकरणी बघता या मिर्ची पावडरमध्ये काहीच उणीव वाटणार नाही. मात्र, प्रत्यक्षात मात्र याची वास्तविकता कळल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. नागपूरच्या अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA नं केलेल्या कारवाईत हा साठा जप्त करण्यात आलाय. नागपुरातील कळमना पोलीस ठाण्याजवळ असलेल्या एका व्यावसायिक प्रतिष्ठानावर धाड टाकत ही कारवाई झाली आहे. 

सुमारे ४,००० किलो मिर्ची पावडर या कारवाईत जप्त केली असून यात भेसळ केल्याचा आणि लाल-भडक रंग येण्याकरता यात कृत्रिम रंग टाकल्याचा आरोप FDA अधिकाऱ्यांनी केला आहे. आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथून मिर्ची पावडरचा हा साठा नागपुरात आलाय.

१३० ते १४० रुपये किलो दराने मिर्ची पावडर विकली जात असताना ही मिर्ची पावडर फक्त ६० ते ७० रुपये किलो दराने ती विकत असल्याने अधिकाऱ्यांचा संशय बळावला. या प्रकरणात सर्व साठा जप्त करण्यात आला असून नमुने प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. गणपती आणि त्यानंतर एका पाठोपाठ सणांची पर्वणी असल्याने असे भेसळ करणे आणि कृत्रिम रंग वापरण्याचा हा प्रकार धक्कादायक आहे. 

या प्रकरणात प्रयोगशाळेतून जप्त केलेल्या नमुन्याचा अहवाल आल्यावरच पुढील कारवाई होणार आहे. मात्र सणा-सुदीच्या काळात भेसळ खोरीच्या या प्रकरणावर चाप बसण्याकरता अधिकाऱ्यांनी अधिक कडक पावले उचलण्याची गरज आहे, यात दुमत नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.