नवी मुंबईतील ६९ नगरसेवक संपत्तीत राजे, शिक्षणात रंक

नवी मुंबई महापालिकेतले तब्बल 69 नगरसेवक हे करोडपती आहेत. मात्र शिक्षणाच्या आघाडीवर सगळीच बोंबाबोंब आहे. एडीआर या सामाजिक संस्थेनं नवी मुंबईच्या नगरसेवकांच्या मालमत्तेचं आणि शैक्षणिक पात्रतेचं केलेलं हे पोस्टमार्टेम...

Updated: Apr 28, 2015, 05:49 PM IST
नवी मुंबईतील ६९ नगरसेवक संपत्तीत राजे, शिक्षणात रंक title=

दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई : नवी मुंबई महापालिकेतले तब्बल 69 नगरसेवक हे करोडपती आहेत. मात्र शिक्षणाच्या आघाडीवर सगळीच बोंबाबोंब आहे. एडीआर या सामाजिक संस्थेनं नवी मुंबईच्या नगरसेवकांच्या मालमत्तेचं आणि शैक्षणिक पात्रतेचं केलेलं हे पोस्टमार्टेम...

संपत्तीतून राजकीय सत्ता आणि राजकीय सत्तेतून संपत्ती... हे चक्र कसं सुरू असतं, हे पाहायचं असेल तर नवी मुंबईच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडं पाहा... असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीआर या सामाजिक संस्थेनं 111 पैकी 105 नगरसेवकांचा अहवाल तयार केलाय.


 

त्यानुसार तब्बल 69 नगरसेवक हे करोडपती आहेत.
त्यातील 14 नगरसेवकांची संपत्ती 10 कोटी रूपयांहून अधिक आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादीच्या 51 नगरसेवकांपैकी 31 जण करोडपती असून, प्रत्येकाकडे सरासरी 3 कोटींची मालमत्ता आहे.
शिवसेनेच्या 33 पैकी 25 नगरसेवक करोडपती असून, त्यांच्याकडे सरासरी 5 कोटी रूपयांची मालमत्ता आहे.
काँग्रेसचे 10 पैकी 6, तर भाजपचे 6 पैकी 5 नगरसेवक करोडपती आहेत.
5 अपक्ष नगरसेवकांपैकी दोघेजण करोडपती आहेत.

या करोडपतींपैकी टॉप 3 श्रीमंत नगरसेवकांच्या मालमत्तेवर नजर टाकली तर डोळे दिपून जातील.

राष्ट्रवादीच्या नेरूळच्या नगरसेविका नेत्रा शिर्के यांच्याकडे तब्बल 40 कोटी 30 लाख 69 हजार 582 रूपयांची मालमत्ता आहे.
त्यापाठोपाठ शिवसेनेचे वाशीचे नगरसेवक किशोर पाटकर यांच्याकडे 37 कोटी 92 लाख 35 हजार 122 रूपयांची संपत्ती आहे.
तर भाजपचे कोपरखैराण्याचे नगरसेवक रामचंद्र घरत यांनी 26 कोटी 3 लाख 19 हजार 656 रूपयांची मालमत्ता दाखवलीय.

शिक्षण : 

मालमत्तेच्या बाबतीत कोटींच्या कोटी उड्डाणे घेणा-या नवी मुंबईतल्या नगरसेवकांना शिक्षणात मात्र फारसा रस नाही.


 

4 पदवीधर, 6 पोस्ट ग्रॅज्युएट आणि 1 डॉक्टर नगरसेवकाचा अपवाद वगळला तर बाकीचे सगळेच अल्पशिक्षित आहेत.

यापैकी 7 जण केवळ अक्षर साक्षर आहेत.
11 नगरसेवकांनी कशीबशी पाचवी पास केलीय.
13 नगरसेवक आठवीपर्यंत शिकलेत.
25 नगरसेवक दहावी पास झालेत.
तर 19 नगरसेवकांनी बारावी पास होण्याचा पराक्रम गाजवलाय.

या 105 पैकी 17 नगरसेवकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यात 13 जणांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत.

एकदा राजकारणात पडलं की, शिक्षण असो किंवा नसो, पैशांच्या राशी पायाशी लोळण घेतात... नवी मुंबईच्या नगरसेवकांकडून हा धडा निश्चितच शिकण्यासारखा आहे...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.