अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या प्रत्येक गावात जाणवते. पाण्याची पातळी खालावल्यानं पाण्याचे स्त्रोतही प्रदूषित होतात. मात्र नागपूरमधील कामठी तालुक्यातल्या एका गावातील गावक-यांनी पिण्याच्या पाण्यावर भन्नाट उपाय शोधलाय.
राज्यभरातील एटीएममध्ये पैशांचा खडखडाट आहे. मात्र नागपूरच्या कामठी तालुक्यात सुरादेवीत एटीएममध्ये पाण्याचा खळखळाट आहे. चकीत झालात? पण हे खरंय... कारण या एटीएममधून पैशांऐवजी पाणी बाहेर निघतंय.. कामठी तालुक्यातील पाण्याची पातळी खालवल्यानं इथं पाण्याचं एटीएमची सुरु करण्यात आलंय.
ज्या पद्धतीनं बँकेचं एटीएम असतं त्याचप्रमाणे गावातलं हे पाण्याचं एटीएम... गावकऱ्यांनी महाराष्ट्र वीज कंपनीच्या मदतीनं CSR निधीतून हे एटीएम सुरु केलं आहे. गावकऱ्यांना यासाठी एटीएम कार्ड देण्यात आलेत. पाण्यासाठी ते रिचार्ज करावे लागतात. पाच रुपयांचं रिचार्ज मारलं की 20 लीटर पाणी तुम्हाला मिळतं.
आजही अनेक गावांत पिण्यासाठी पाणी नाहीये.. त्यामुळे शासनानं अशा प्रकारचे पाण्याचे एटीएम गावा-गावात सुरु केले तर किमान त्या गावात राहणा-या नागरिकांची तहान भागेल.