गडचिरोलीत १२ नक्षलवादी नसबंदीपासून मुक्त

गडचिरोलीत पोलिसांना नक्षल चळवळीचा बिमोड करण्यासाठी कोणत्या सूक्ष्म स्तरावर काम करावं लागतं याची चुणूक पोलिस दलाच्या एका ठाम निर्णयाने दिली. नक्षल चळवळीत बळजबरीने नसबंदी केल्या गेलेल्या शरणागती पत्करलेल्या १२ नक्षलवाद्यांना नसबंदीपासून मुक्त करण्यात आलंय. 

Updated: Jan 1, 2016, 05:07 PM IST
गडचिरोलीत १२ नक्षलवादी नसबंदीपासून मुक्त title=

गडचिरोली : गडचिरोलीत पोलिसांना नक्षल चळवळीचा बिमोड करण्यासाठी कोणत्या सूक्ष्म स्तरावर काम करावं लागतं याची चुणूक पोलिस दलाच्या एका ठाम निर्णयाने दिली. नक्षल चळवळीत बळजबरीने नसबंदी केल्या गेलेल्या शरणागती पत्करलेल्या १२ नक्षलवाद्यांना नसबंदीपासून मुक्त करण्यात आलंय. 

गडचिरोली पोलिस दलाचा एक निर्णय या आत्मसमर्पित नक्षल्यांसाठी एका अर्थाने टर्निंग पॉईंट ठरलाय. अत्यंत कमी वयात नक्षल चळवळीत सामील झालेल्या गडचिरोली आणि दंडकारण्य भागातील आदिवासी युवकांना चळवळीतील वरिष्ठ नेत्यांच्या दबावामुळे अल्पवयातच नसबंदी करावी लागते. गेल्या काही वर्षात नक्षल चळवळीचे आकर्षण झपाट्याने कमी झाले आहे. 

यासोबत राज्य सरकारने प्रभावी आत्मसमर्पण धोरण राबविल्याने २ वर्षात तब्बल ९५ नक्षल्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला आहे. मुख्य प्रवाहात सामील झालेल्यांनी विवाह देखील केले आहेत. मात्र संतती सुखाच्या प्राप्तीसाठी नसबंदी शस्त्रक्रिया फिरविणे गरजेचे होते. यातील आर्थिक अडचण व सुविधा लक्षात घेता गडचिरोली पोलिस दलाने पुढाकार घेत १२ शस्त्रक्रिया सफल केल्या आहेत. 

या सफल शस्त्रक्रिया करून घेणा-यात कमांडर, उपकमांडर, कंपनी प्रमुख आदींचा समावेश आहे. या सदस्यांनी सामान्य जीवन जगावे यासाठी गडचिरोली पोलिस दल सदैव प्रयत्नरत असून चळवळीतून मुख्य प्रवाहात आलेल्या या सदस्यांच्या रोजगार आणि पुनर्वसनाची जबाबदारी पोलीस दल सतत घेत राहील अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे. चळवळीच्या अनिश्चित वातावरणातून रोजगार, विवाह, घर आणि चौकोनी कुटुंबाचे स्वप्न साकारणा-या या निर्णयाकडे टर्निंग पॉईंट रुपात पाहिले जात आहे.