जालना : केंद्रीय राज्यमंत्र्यांचा बालेकिल्ला अशी ओळख झालेल्या भोकरदन विधानसभा मतदार संघात गेल्या १२ वर्षांपासून मात्र राष्ट्रवादीची सत्ता आहे. दानवेंनी खासदारकी जिंकली असली तरी त्यांच्या पत्नी निर्मला दानवेंना मात्र राष्ट्रवादीच्या चंद्रकांत दानवेंकडून पराभव स्वीकारावा लागलाय.
विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -
शिवसेना - रमेश गव्हाळ
भाजप - संतोष दानवे
काँग्रेस - सुरेश गवळी
राष्ट्रवादी - चंद्रकांत दानवे
मनसे - दिलीप वाघ
यंदा खासदार दानवेंचे पूत्र संतोष दानवे निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. जालना जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदार संघात होणा-या निवडणुकीत घनसावंगीनंतर भोकरदनमध्ये होणाऱ्या राजकीय़ लढतीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत चौथ्यांदा विजयी होऊन मोदींच्या मंत्रिमंडळात अन्न आणि नागरीपुरवठा राज्यमंत्रीपदी विराजमान झालेले रावसाहेब दानवे यांचा हा बालेकिल्ला समजला जातो. पण दानवेंच्या या बालेकिल्ल्यात गेल्या 12 वर्षांपासून राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं आहे.
गेल्या निवडणुकीत चंद्रकांत दानवेंची टक्कर खासदार दानवेंच्या पत्नी निर्मला दानवे यांच्याशी झाली.या लढतीत निर्मला दानवेंना 65 हजार 841 तर चंद्रकांत दानवेंना 67 हजार 480 मते मिळाली. या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे अगदी काठावर म्हणजेच 1 हजार 639 मतांनी निवडून आले.
भोकरदन विधानसभा मतदारसंघात अनेक प्रकारची विकासकामे केल्याचा दावा चंद्रकांत दानवेंनी केलाय.
- सिंचनाची कामे,
- 220 के.व्ही. वीजकेंद्र,
- रस्ते दुरूस्ती
- दलित समाजाला महामंडळकडून विविध योजनांचा लाभ
अशी विविध विकास कामे केल्याचा दावा आमदार चंद्रकांत दानवेंनी केलाय.
विरोधकांनी मात्र चंद्रकांत दानवेंचा हा दावा खोडून काढलाय. भाजपच्या फिलगुडचा फायदा उठवण्याची त्यांनी मोहीम आखलीय. त्यामुळे अर्थातच राष्ट्रवादीच्या चंद्रकांत दानवेंच्या विकासकामांवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.
भोकरदन विधासभा मतदारसंघात सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून दावेप्रतीदावे केले जात असले तरी या मतदार संघात काही प्रश्न अद्यापही कायम आहेत.
- ग्रामीण भागातील रस्ते विकास
- जलसिंचनाच्या सुविधा
- भोकरदन – राजूर रस्त्याचे दुपदरीकरण
- मका - सोयाबीन पिकांवर प्रक्रिया उद्योग
- तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतींचे पालिकेत रुपांतर करणे
या प्रमुख समस्या अद्यापही कायम आहेत. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येतेय. आगामी विधानसभा निवडणुकीत भोकरदन विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून चंद्रकांत दानवे हे पुन्हा एकदा निव़डणुकीच्या रिंगणात उतरलेत. तर त्यांना भाजपकडून संतोष दानवे यांनी आव्हान दिलंय. त्यामुळे गेल्यावेळी प्रमाणेच यावेळीही सामना रंगतदार आणि तितकाच अटीतटीचा असेल असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय.
राष्ट्रवादीच्या चंद्रकांत दानवेंच्या गाठिशी अनुभवाची शिदोरी आहे. तर रावसाहेब दानवेंचे सुपूत्र संतोष दानवे त्या मानाने नवखे उमेदवार आहेत. त्यामुळे मोदी मंत्रीमंडळात स्थान मिळवलेल्या रावसाहेब दानवेंना ही लढत जिंकण्याचं शिवधनुष्य पेलावं लागणारे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.