आचारसंहितेचा भंग अजितदादांना महागात पडणार?

ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

Updated: Oct 10, 2014, 07:12 PM IST
आचारसंहितेचा भंग अजितदादांना महागात पडणार? title=

परभणी : ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

आचार संहितेचा भंग तसंच एक लाखांपेक्षा जास्त रोकड बाळगल्याप्रकरणी अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. परभणीच्या गंगाखेड मतदारसंघात एका गाडीत तब्बल 4 लाख 85 हजार रुपयांची रोकड सापडली होती... याच प्रकरणाचे धागेदोरे अजित दादांशी जुळून आल्यानं अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोबतच, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये अजित पवार यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

महत्त्वाचं म्हणजे, या प्रकरणात अजित दादांवर निवडणूक आयोगाकडून थेट कारवाई होऊ शकत नाही. परंतु, आपली बाजू मांडण्याची संधी अजित दादांना दिली जाऊ शकते. 

काय आहे प्रकरण...
8 ऑक्टोबर रोजी जिंतूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या स्कार्पिओ गाडीत पोलिसांना 4 लाख 85 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली होती. सोबतच, या गाडीत अजित पवार यांचे कपडेही पोलिसांना आढळून आले होते.

ड्रायव्हरची चौकशी केली असता त्यानं हे कपडे आणि पैशांची बॅग अजित पवारांच्या पीएचे असल्याचं उत्तर दिलं होतं.

यावर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ‘या पैशांच्या बाबतीत मला काही माहित नाही, हा पक्ष निधी असू शकतो, यावर आम्ही निवडणूक आयोग, गरज पडल्यास आयकर विभागाला स्पष्टीकरण देऊ’ असं म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.     

'गंगाखेड'मध्ये पैशाला ऊत... 
गंगाखेड मतदारसंघाबाबतीत बोलायचं म्हणजे, अजित पवार यांच्या अगोदर अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना अटक करण्यात आली होती.

2 ऑक्टोबर रोजी तांदुळवाडी इथं प्रत्येक मतदाराला 900 रुपये प्रमाणे पैसे वाटप झाल्याचं निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आलं होतं. चौकशी केल्यानंतर गेल्या शनिवारी रात्री दोन वाजता गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट यांना घरातून अटक करण्यात आली होती.

तर, गेल्या शनिवारी पोलिसांनी 1,87,450 रुपये एका जीपमध्ये पकडले. कपबशी चिन्ह असलेल्या उमेदवारानं हे पैसेवाटप केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी राष्ट्रीय समाज पक्षा'चे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना अटक केली. 

या दोघांवर पैसे वाटप करून मतदारांना प्रलोभन दाखविल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण, अटक झाल्यानंतर काहीवेळेतच दोघांचीही जामिनावर सुटका झाली.    

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.