मनसेचा दुटप्पीपणा उघड... गुजरातींपुढे लोटांगण!

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ढोंगीपणा आता उघड झालाय. 

Updated: Oct 9, 2014, 07:24 PM IST
मनसेचा दुटप्पीपणा उघड... गुजरातींपुढे लोटांगण! title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बोलण्यातला आणि त्यांच्या पक्षाच्या वास्तवातला दुटप्पीपणा आता उघड झालाय. मतांचा जोगवा मागण्यासाठी गुजराती भाषेतून पत्रकं काढण्याची वेळ मनसेच्या उमेदवारांवर आलीय.  

अमेरिकेत बराक ओबामांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातृभाषेत 'केम छो?' असं म्हणत त्यांचं स्वागत केलं. त्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जोरदार टीका केली. एवढंच नाही तर भाजपचे उमेदवार प्रकाश मेहता यांनी आपल्या प्रचाराच्या ट्रकवर प्रचाराचे बॅनर्स गुजराती भाषेत लिहिले. त्यावरून राज ठाकरेंनी त्यांनाही टीकेचं लक्ष्य बनवलं.

एखाद्याला जवळिक वाटावी म्हणून सुरुवातीला दोन शब्दही त्यांच्या मातृभाषेत उच्चारलेले राज ठाकरेंना खपत नाही... पण आता त्याच राज ठाकरेंच्या उमेदवारांना गुजराती मतांसाठी गुजरातीत पत्रकं काढण्याची वेळ आलीय. गुजराती मतांचा जोगवा मागण्यासाठी मनसेचे उमेदवार गुजराती भाषेतून त्यांच्यापुढं पायघड्या अंथरत आहेत.


नितीन सरदेसाई यांचं प्रचार पत्रक

मनसेच्या या दुटप्पी भूमिकेमुळे शिवसेनेला टीका करण्याची आयतीच संधी मिळालीय. एकीकडे मराठी अस्मितेच्या गोष्टी... तर दुसरीकडे उमेदवारांनी मात्र गुजरातीमधून पत्रकं छापायची... इंग्रजी भाषेतून होर्डिंग लावायची, असे प्रकार सर्रास सुरू आहेत.  

'लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण' अशीच राज ठाकरेंच्या मनसेची अवस्था झालीय. एकीकडे जाहीर भाषणातून मराठी अस्मितेच्या गप्पा मारायच्या, नरेंद्र मोदींच्या गुजराती प्रेमावर आसूड ओढायचे आणि मनसेच्या उमेदवारांनी मात्र गुजरातीमधून पत्रकं छापायची... इंग्रजी भाषेतून होर्डिंग लावायची... हा दुटप्पीपणा असल्याची चौफेर टीका आता मनसेवर होऊ लागलीय. उक्तीमध्ये आणि कृतीमध्ये असा फरक असेल तर मनसेवर विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्न मतदारांना पडला तर आश्चर्य वाटायला नको. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.