मुंबई: विधानसभा निवडणूक अनेक अर्थानं ऐतिहासिक ठरलीये. ही निवडणूक जशी बहुरंगी, प्रस्थापितांना धक्के देणारी ठरली तशीच नव्याना संधी देणारीही होती. नाशिकमध्ये चार नगरसेवक आमदार झालेत. तर मुंबईतलेही पाच नगरसेवक आता विधानसभेत गेले आहेत.
निवडणुकीपूर्वी युती आणि आघाडी तुटल्यामुळं या निवडणुकीत महापालिकेतील नगरसेवकांना उमेदवारीची अक्षरश: लॉटरी लागली होती. यावेळी सर्व पक्षांचे मिळून २६ नगरसेवक रिंगणात उतरले होते. शिवसेनेचे चार, भाजपचे आठ, मनसेचे पाच, अपक्ष तीन, राष्ट्रवादीचे तीन, काँग्रेसचे चार नगरसेवक रिंगणात उतरले होते. शिवसेना, भाजप वगळता कोणत्याही पक्षाच्या एकाही नगरसेवकाला जिंकता आलेलं नाही. २००९मध्ये १९ नगरसेवक रिंगणात होते. त्यापैकी आठ नगरसेवक विधानसभेवर निवडून आले होते.
मुंबई
तर मुंबईतही शिवसेनेचे दोन आणि भाजपचे तीन नगरसेवक विधानसभेवर निवडून गेले आहेत. निवडणुकीत्. रिंगणात उतरलेल्या २७ नगरसेवकांपैकी २१ जणांना पराभव पत्करावा लागला आहे. शिवसेनेचे माजी महापौर सुनील प्रभू, नगरसेवक अशोक पाटील तर भाजपचे अजित साटम, तमीळ सेल्वन आणि मनीषा चौधरी यांचा विजय झालाय.
नाशिक
विधानसभा निवडणुकीत अनेकांचे निकाल लागलेत. कित्येकांची ‘गणित’ बिघडलीयेत. कोणी पक्षाशी बंडखोरी करून पायावर कुऱ्हाड मारून घेतली, तर कोणी राजकारणासाठी नाते संबध बिघडवून घेतले. नाशिक जिल्ह्यातील ५ आमदारांना नाशिककरांनी पुन्हा संधी दिलीये. तर तब्बल ७ जणांना नाकारलं. तिघांनी तर निवडणुकीच्या आधीच माघार घेतली होती. त्यात शिवसेनच्या बबन घोलपांना न्यायालयाच्या दणक्यामुळं निवडणुकींपासून दूर रहावच लागलं.
दोघा माजी आमदारांना जनतेनं पुन्हा संधी दिली तर आठ नवे चेहरे विधिमंडळात दिसणार आहेत. त्यात नाशिक महानगरपालिकेच्या चार नगरसेवकांचा समावेश आहे. हे चारही नगरसेवक भाजपच्या तिकिटावर आमदार झालेत. चांदवड मतदारसंघातून राहुल आहेर, नाशिक पूर्वमधून बाळासाहेब सानप, पश्चिम मधून सीमा हिरे तर नाशिक मधून देवयानी फरांदे विजयी झालेत. एकाच वेळी चार नगरसेवक आमदार बनण्याची नाशिक मधील ही पहिलीच वेळ आहे.
नाशिक पूर्वचे आमदार बाळासाहेब सानप हे पंचवटी प्रभागातील नगरसेवक आहेत. त्यांच्याच प्रभागात कुंभमेळा भरतो. मागील कुंभमेळाच्या वेळीही ते नगरसेवक होते. उपमहापौर, महापौरपदही सांभाळल्यानं प्रशासकीय अनुभव त्यांना आहे. विधानसभेच्या या निवडणुकीत नाशिक शहरातील १३ नगरसेवकांनी आमदार बनण्याचं स्वप्न बघितलं होतं. मात्र केवळ चौघांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.