'मनसे यापुढे लोकसभा लढवणार नाही'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापुढे लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेला आतापर्यंत लोकसभेत यश मिळालेलं नाही, हे या मागचं कारण नक्कीच नाही. कारण राज ठाकरे यांनी या मुद्यावर मत माडलं आहे.

Updated: Oct 14, 2014, 12:14 PM IST
'मनसे यापुढे लोकसभा लढवणार नाही' title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापुढे लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेला आतापर्यंत लोकसभेत यश मिळालेलं नाही, हे या मागचं कारण नक्कीच नाही. कारण राज ठाकरे यांनी या मुद्यावर मत माडलं आहे.

देशाचा कारभार राष्ट्रीय पक्षांनी चालवावा आणि राज्याची सत्ता प्रादेशिक पक्षांकडेच असावी, अशी आपली भूमिका असून या भूमिकेवर आपण ठाम असून यामुळे यापुढे आपला पक्ष लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असे राज ठाकरे यांनी सोमवारी येथे जाहीर केले. त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये नेमके अधिकार कसे असले पाहिजेत, हा विषय घेऊन लढा देणार असल्याचे राज म्हणाले.

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी, सोमवारी राज यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनसेच्या आगामी काळातील वाटचालीबद्दल मते मांडली. यापुढे लोकसभेपेक्षा विधानसभेवरच जास्त लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगतानाच केंद्र व राज्य यांच्यातील नेमक्या अधिकारांवर लढा देणार असल्याचे ते म्हणाले. 

राज्यात प्रादेशिक पक्षांचीच सत्ता असणे आवश्यक असून तेच राज्याचा विकास करू शकतील, अशी भूमिका राज यांनी मांडली. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनीही केंद्राला गुजरातकडून कर मिळणार नाही, अशी भूमिका मांडली होती. राज्यांनी केंद्राला कर देऊ नये असे आपले म्हणणे नाही. तथापि, राज्याशी संबंधित निर्णय घेण्याचे अधिकार राज्यांना मिळाले पाहिजेत, असे ते म्हणाले.  

नरेंद्र मोदी यांना अफजलखानापासून दिल्ली की बिल्लीपर्यंत उपमा देणाऱ्या शिवसेनेने आपला मंत्री अजूनही केंद्रीय मंत्रिमंडळात का ठेवला, असा सवाल करत केंद्रात व पालिकेत भाजपशी संबंध ठेवले ते केवळ 'इन्कम सोर्स'साठीच, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. 

बीकेसीतील भाषणात उद्धव ठाकरे मोठी घोषणा करणार असे सांगण्यात आले होते ती घोषणा का झाली नाही, कोठे गेली ती घोषणा, असा सवालही राज यांनी केला.

राज्यातील अनेक प्रश्नांवर केंद्राची परवानगी लागत असल्यामुळे राज्यांच्या विकासाला मोठी खीळ बसते. आगामी काळात देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केंद्र-राज्यातील अधिकाराच्या मुद्दय़ावर पत्र लिहिणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.