जनतेनं नाकारलं, मनसेचा फुसका बार, दिग्गज गडगडले!

विधानसभा निवडणुकीत तिखट शब्दात विरोधकांवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेनं लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही सपाटून मार खाल्ला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदारांसह विधानसभेची पायरी चढणाऱ्या मनसेला यंदाच्या निवडणुकीत अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलंय. मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, शिशीर शिंदे या नेत्यांचा यंदा दारुण पराभव झाला आहे. 

Updated: Oct 19, 2014, 05:05 PM IST
जनतेनं नाकारलं, मनसेचा फुसका बार, दिग्गज गडगडले! title=

मुंबई: विधानसभा निवडणुकीत तिखट शब्दात विरोधकांवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेनं लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही सपाटून मार खाल्ला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदारांसह विधानसभेची पायरी चढणाऱ्या मनसेला यंदाच्या निवडणुकीत अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलंय. मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, शिशीर शिंदे या नेत्यांचा यंदा दारुण पराभव झाला आहे. 

२००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करुन राज ठाकरे यांनी शिवसेनेला शह दिला. मराठीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी परप्रांतियावर हल्लाबोल केला आणि देशभरात ते चर्चेचा विषय ठरले. २००९ च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना तब्बल १३ जागांवर विजय मिळाला तर अनेक ठिकाणी मनसेमुळं शिवसेना - भाजप उमेदवारांचा पराभव झाला. 

त्यापाठोपाठ नाशिक महापालिकेत मनसेचा झेंडा फडकल्यानं राज्याच्या राजकारणात मनसे महत्त्वाची भूमिका निभावेल असं दिसत होतं. मात्र आक्रमक भाषण वगळता अन्य ठोस कोणताही मुद्दा नसल्यानं मनसेची पिछेहाट झाल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत मोदीनामाचा जप करणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत मोदींना कडाडून विरोध केला. मोदींच्या गुजराती अस्मितेवरुन मराठी अस्मितेचं राजकारण करु पाहणारे राज ठाकरे हे मतदारांना आकर्षित करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत.  

२००९ च्या विधानसभेत मनसेने १४३ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी १३ आमदार निवडून आले होते तर एकूण मतांपैकी तब्बल ५.७१ टक्के मतं मनसेच्या वाट्याला आली होती. तर यंदाच्या निवडणुकीत २१९ जागा लढवणाऱ्या मनसेला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला आहे. तर एकूण मतांपैकी मनसेला अवघी ३ टक्के मतंच मिळवता आली आहेत. विशेष बाब म्हणजे राज ठाकरेंची निकटवर्तीय समजले जाणारे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, नाशिकचे गिते यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.