परळी : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आलं, मात्र पुतणे धनंजय मुंडे यांची मीडियात फारशी चर्चा होतांना दिसत नाहीय.
धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीकडून बहिण पंकजा मुंडे ज्या भाजपच्या उमेदवार आहेत, त्यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.
पंकजा मुंडे यांच्याविरोधात शिवसेनेचे पश्रप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिलेला नाही, मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात जोरदार चुरस होणार असल्याचं बोललं जातंय.
गोपीनाथ मुंडे यांचं नुकतंच निधन झाल्याने भावनिक झालेल्या परळीकर मोठ्या प्रमाणात पंकजा मुंडे यांना कौल देतील असा तर्क बांधण्यात येत होता.
मात्र दुसरीकडे ऐन निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला होता की घातपात, ही शंका अजूनही गोपीनाथ मुंडे प्रेमींच्या मनात कायम आहे. अशात ऐन निवडणुकीच्या काळात गोपीनाथ मुंडेच्या मृत्यूवर सीबीआयचा अहवाल आल्याने, पुन्हा तो मुद्दा समोर आलाय. सीबीआयने हा अपघातच असल्याचं म्हटलंय. मात्र एवढा मोठा नेता एका क्षणात गेला यावर सामान्य जनतेचा विश्वास बसणे तसं कठीण झालंय. याचा राग पक्षावर निघण्याची शक्यताही बोलली जातेय.
शरद पवारांनी येथे घेतलेल्या सभेत आपण मुंडेंच्या अपघाताच्या चौकशीसाठी पीएमओला पत्र लिहल्याचं म्हटलं होतं.
धनंजय मुंडे यांची गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर मीडियात चर्चा कमी झाली असली तरी, सामान्य जनतेला हरवलेला नेता आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात दिसतोय.
यात धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवलेले आहेत, गोपीनाथ मुंडेचा दांडगा जनसंपर्क धनंजय यांना माहित होताय, कार्यकर्ता ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताळण्याची हातोटी धनंजय यांच्याकडे असल्याचं बोललं जातंय. यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात चुरशीचा सामना होणार असल्याचं बोललं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.