... तर भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक होईन - ओम पुरी

भारतातल्या कट्टरपंथियांनी त्रास दिला तर आपण पाकिस्तानात जाऊन स्थायिक होऊ, अशी धमकीच अभिनेता ओम पुरी यांनी दिल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियानं दिलंय. ओम पुरी हे सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. 

Updated: Dec 18, 2015, 04:56 PM IST
... तर भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक होईन - ओम पुरी  title=

लाहौर : भारतातल्या कट्टरपंथियांनी त्रास दिला तर आपण पाकिस्तानात जाऊन स्थायिक होऊ, अशी धमकीच अभिनेता ओम पुरी यांनी दिल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियानं दिलंय. ओम पुरी हे सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. 

रफी पीर थिएटर वर्कशॉपनं आयोजित केलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये भाग घेण्यासाठी ओम पुरी सध्या पाकिस्तानात दाखल झालेत. 

यावेळी अलहामरा आर्ट सेंटरमध्ये मीडियाशी बोलताना,  दादरी हत्याकांड ही देशाला काळीमा फासणारी घटना होती.... आणि या विधानावर भारतातल्या कट्टरपंथियांनी आपल्याला त्रास दिला तर आपण भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक होऊ, असं त्यांनी म्हटल्याचा दावा पाकिस्तानी मीडियानं दिलंय. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ मात्र उपलब्ध नाही. 

दोन्ही देशांतल्या सरकारला घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. कारण देशातील ८०-९० टक्के लोक सेक्युलर आहेत आणि ते पाकिस्तानी नागरिकांशी घृणा करत नाहीत. भारतात गोहत्येवर बंदी आणण्याची भाषा करणारे ढोंगी लोक आहेत. भारतातून बीफ निर्यात केलं जातं आणि डॉलसर कमावले जातात, असंही त्यांनी म्हटल्याचं पाकिस्तानी मीडियातून समोर येतंय. 

भारतातून पाकिस्तान वेगळं झालं नसतं तर आज मुंबईच्या ऐवजी लाहोरमध्ये फिल्म इंडस्ट्री असती, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.