मुंबई : सध्या एक आगामी सिनेमा चर्चेत आहे.... त्याचं नाव पदमावती... याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळींवर हल्ला झाला... इतिहासाशी छेडछाड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे... पण, नेमकी कोण होती ही पदमावती...
चितौडचा किल्ला वैभवशाली इतिहासाच्या खाणाखुणा मिरवत आजही अभेद्यपणे उभा आहे... नितांत सुंदर सौंदर्य, निरातिशय प्रेम, धाडस आणि सर्वोच्च त्याग या सगळ्याचा आता हा एकमेव साक्षीदार उरलाय... राजा रतन सिंहाचा हा किल्ला... पण त्या किल्ल्याला ऐतिहासिक कोंदण मिळालं ते राणी पद्मावतीच्या धाडसामुळे आणि त्यागामुळे...
पद्मावती ही सिंहल प्रांतातल्या राजा गंधर्वाची मुलगी... तिचं सौंदर्य पाहताच क्षणी प्रेमात पाडणारं... पद्मावतीची काया एवढी नितळ होती की तिनं खाल्लेला विडा आणि प्यायलेलं पाणीही तिच्या घशातून आरपार दिसायचं, असं तिचं वर्णन मोहम्मद मलिक जयासीनं लिहिलेल्या पद्मावतमध्ये करण्यात आलंय. चितोडगडचा राजा रतन सिंहानं पद्मावतीला स्वयंवरात जिंकलं आणि तो पदमावतीला घेऊन चितोडमध्ये आला... सारं काही सुरळीत सुरू असताना या सगळ्याला कलाटणी मिळाली ती एका घटनेमुळे...
रतन सिंहाच्या दरबारी अनेक भाट होते, गायक होते... रतन सिंह कलेवर प्रेम करणारा होता... त्याच्या दरबारातला संगीतकार राघव चेतन काळी जादू करायचा... आणि दुष्ट शक्तींना जागृत करायचा. जेव्हा राजाला हे समजलं, तेव्हा त्यानं राघव चेतनला शिक्षा म्हणून त्याची गाढवावरुन धिंड काढली... हा अपमान राघव चेतनला सहन झाला नाही आणि त्यानं दिल्ली गाठली ती रतनसिंहाचा बदला घेण्याच्या उद्देशानंच....
दिल्लीतला मुघल सेनानी अल्लाऊद्दीन खिलजीला त्यानं पद्मावतीच्या सौंदर्याच्या कहाण्या सांगितल्या...पद्मावतीच्या सौंदर्यानं वेडा झालेल्या खिलजी लाळघोटेपणा करत लगेच चितोडमध्ये दाखल झाला. एकदा तरी पद्मावतीचं दर्शन व्हावं, असा निरोप त्यानं राजा रतनसिंहाला धाडला. पतिव्रता आणि कुलसंपन्न पद्मावतीनं अर्थातच हा प्रस्ताव नाकारला... पण अल्लाऊद्दीनच्या प्रचंड ताफ्यापुढे आपल्या सैन्याचा निभाव लागेल की नाही, याची शाश्वती नसल्यानं अखेर पद्मावती मुखदर्शनासाठी तयार झाली. तरीही हुशार आणि चलाख पद्मावतीनं एक अट घातली.
अल्लाऊद्दीनला आपण मुखदर्शन देऊ पण ते आरशातून, अशी पद्मावतीची अट होती... अल्लाउद्धीन खिलजी भेटीसाठी आला त्यावेळी आरशांची रचना अशी करण्यात आली होती की पद्मावतीचा चेहरा एका आरशात दिसेल, पण ती प्रत्यक्ष कुठे बसलीय, हे अजिबात ओळखता येणार नाही...
पद्मावतीच्या मुखदर्शनानं अल्लाऊद्दीन खिलजी आणखीनच पिसाळला... पद्मावतीला आपली दासी बनवण्यासाठी त्यानं शक्कल लढवली... राजा रतनसिंहला स्वतःच्या महालात बोलावून अल्लाऊद्दीन खिलजीनं त्याला जेरबंद केलं... यानंतर पद्मावती शरण येईल, अशी त्याला अपेक्षा होती. पण पद्मावतीनं ही सगळी परिस्थिती अत्यंच धाडसानं, संयमानं आणि हुशारीनं हाताळली... तिनं पुन्हा अट घातली...
मी एकटीच नाही तर माझ्याबरोबर दासींचा ताफाही तुमच्या भेटीला येईल, असं तिनं अल्लाउद्दीन खिलजीला कळवलं. ठरल्याप्रमाणे पालख्या रवाना झाल्या... पण पद्मावतीनं या पालख्यांमध्ये तब्बल सात हजार सशस्त्र सैनिक खिलजीकडे धाडले... अल्लाऊद्दीनला याचा सुगावाही लागला नाही... पद्मावतीच्या सैन्यानं खिलजीच्या सैन्यावर आक्रमण केलं आणि राजा रतनसिंहाची सुखरूप सुटका केली.
या मानहानीनंतर खिलजी प्रचंड संतापला आणि प्रचंड मोठा ताफा घेऊन चितोडवर चाल करुन आला... चितोडमध्ये तुंबळ लढाई झाली... या युद्धात राजा रतन सिंहांना जीव गमवावा लागला. आता आपण अल्लाऊद्दीन खिलजीच्या हाती लागणार, हे पद्मावतीला कळून चुकलं आणि तिनं चितोडच्या किल्ल्यावर जोहाराची तयारी केली. खिलजीचं सैन्य गडावर पोहोचण्याआधीच पद्मावतीनं मोठी चिता तयार केली आणि त्यात पद्मावतीसह तब्बल 16 हजार दासींनी जोहार केला.
परपुरुषाच्या हाती लागून दुसऱ्या राजवटीची दासी होण्यापेक्षा तिनं सर्वोच्च त्याग केला आणि पद्मावती हे नाव इतिहासात अजरामर झालं...