मुंबई : अभिनेत्री विद्या बालन हिला सध्या हिंदुजा हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. त्यामुळे, तिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्याचा प्लान मात्र थोडा बदललाय.
विद्या बालन हिला मूत्रपिंडाचा ( किडनी स्टोनचा) त्रास असल्याचं सांगण्यात आलंय. तिला सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलंय.
विद्याला तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूर यांनी हॉस्पीटलमध्ये दाखल केलं होतं. अबूधाबीहून आपल्या गंतव्य स्थानासाठी रवाना होणाऱ्या विद्याला पाठिमध्ये भयंकर त्रास सुरू झाला होता. त्यामुळे, विमानातच डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं. यावेळी, विद्याला खूप तापही भरला होता.
त्यामुळे विद्या-सिद्धार्थला विमानातून खाली उतरावं लागलं. विमानतळावरच्या क्लिनिकमध्ये विद्याला सुरुवातीला दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिला हिंदुजा हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं.
विद्या आणि सिद्धार्थ यांनी नववर्षाच्या स्वागताचा आणि १ जानेवारी रोजी असलेला विद्याचा वाढदिवस साजरा करण्याचा प्लान बनवला होता. यासाठी त्यांनी एका अज्ञात स्थळी जाण्यासाठी तयारीही सुरू केली होती.