मुंबई: बॉलिवूडमधील अभिनेता सैफ अली खानचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून अहवालही मागितल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे.
अभिनेता सैफ अली खाननं फेब्रुवारी २०१२ रोजी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरुन अनिवासी भारतीयाला मारहाण केली होती. या प्रकरणी मुंबईतील कोर्टानं सैफवर आरोप निश्चित केले आहे. २०१० मध्ये सैफ अली खानला कला आणि मनोरंजन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला अशा स्वरुपाचे पुरस्कार देता येत नसल्यानं सैफला दिलेला पद्मश्रीचा पुरस्कार परत घ्यावा अशी मागणी केली जात होती. माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंदर्भात आरटीआय अंतर्गत माहिती मागवली होती.
केंद्रीय गृहमंत्रालयानं २० ऑगस्ट २०१४ मध्ये मुंबई पोलिसांना पत्र पाठवून सैफ अली खानप्रकरणात अहवाल मागवला होता. मात्र मुंबई पोलिसांनी अजून अहवाल सादर केला नसून या कामाला गति देण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत, असं उत्तर केंद्रीय गृहमंत्रालयानं अग्रवाल यांना दिलं आहे. यामुळं सैफ अली खानचा पद्मश्री पुरस्कार परत जाण्याची चर्चा पुन्हा जोर धरु लागली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.