मराठीलाही पडलीय साऊथ सिनेमांची भूरळ

साऊथ स्टाईल सिनेमांची भूरळ सध्या मराठी सिनेमांना पडली आहे. येणाऱ्या काळात अनेक साऊथ सिनेमांचे रिमेक तसेच साऊथ स्टाईल सिनेमे रसिकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे बॉलिवूडचा हा ट्रेंड मराठीमध्येही येतोय, असं दिसतंय. 

Updated: Jan 29, 2016, 11:08 AM IST
मराठीलाही पडलीय साऊथ सिनेमांची भूरळ title=

कपिल देशपांडे, मुंबई : साऊथ स्टाईल सिनेमांची भूरळ सध्या मराठी सिनेमांना पडली आहे. येणाऱ्या काळात अनेक साऊथ सिनेमांचे रिमेक तसेच साऊथ स्टाईल सिनेमे रसिकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे बॉलिवूडचा हा ट्रेंड मराठीमध्येही येतोय, असं दिसतंय. 

येणा-या काळात गुरु, फ्रेण्ड्स, वृंदावन, मि एन्ड मिसेस सदाचारी असे अनेक साऊथ स्टाईल मराठी सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला 'गुरु' याचं उत्तम उदाहरण आहे. संजय जाधव दिग्दर्शित आणि अंकुश चौधरी स्टारर या सिनेमात फुल टु मसाला ठासून भरला आहे. सिनेमाला तिकिट खिडकीवरही चांगलचं ओपनिंग मिळालं आहे. हा कलरफुल गुरु रसिकांना चांगलाच भावला आहे. एका साऊथ सिनेमाचा मराठी रिमेक असलेल्या या सिनेमात फ्रेम टप फ्रेम कॉपी करण्यात आली आहे. त्यामुळेच हा गुरु लार्जर दॅन लाईफ वाटतो.

गुरुच्या आधी स्वप्नील जोशी, सचित पाटील आणि गौरी नलावडे दिग्दर्शित 'फ्रेण्ड्स' हा सिनेमाला आला होता. सिनेमाला पूर्णपणे साऊथ टच देण्यात आला होता. मात्र या सिनेमाला रसिकांनी साफ नाकारलं.

फेब्रुवारीमध्ये वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे स्टारर 'मि एन्ड मिसेस सदाचारी' प्रदर्शनासाठी सज्ज आहे. साऊथचा सुपरहिट सिनेमा 'मि एन्ड मिसेस रामाचारी'चा हा रिमेक आहे. सिनेमाच्या ट्रेलरवरुन या सिनेमातही 'फ्रेम टू फ्रेम' कॉपी करण्यात आल्याचं दिसतयं. एव्हढच नाही तर या सिनेमाचं टायटल सॉंगही कॉपी करण्यात आलंय.

'वृंदावन' हा सिनेमादेखील याच पठडीतला आहे. राकेश बापट, वैदेही परशुरामी, पूजा सावंत, महेश मांजेरेकर, शरद पोंक्षे, अशोक सराफ, भारत गणेशपुरे अशी भलीमोठी स्टारकास्ट असलेला हा सिनेमाही साऊथच्या सुपरहिट 'ब्रिंदावन' या सिनेमाचा रिमेक आहे. सिनेमाच्या प्रोमोनं रसिकांना भूरळ घातली असून सिनेमाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. सिनेमातील एक्शन सीन्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेतायत. 

मराठी सिनेमा सशक्त कथानकासाठी ओळखला जातो. मात्र, आता निर्मात्यांनी गल्ला भरण्यासाठी मसाला सिनेमांचा फॉम्युला वापरताना दिसतायत. साऊथ सिनेमांच्या रिमेकचा हा फॉम्युला बॉलिवूडनंतर मराठीतही पाय रोऊ बघतोय. ही गोष्ट मराठी सिनेमासाठी घातक ठरते की फायदेशीर हे बघणे उत्सुकतेचं ठरणार आहे.