मुंबर्ई : 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमातील खाँ साहेबांची भूमिका ही माझ्या करिअरचा टर्निंग पॉईंट आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केलीय.
‘हा माझा मार्ग एकला’ म्हणत बालवयातच अभिनयाची कारकिर्द सुरू करणारे आणि पुढे अभिनय हाच आपला मार्ग बनवत त्यावरून चालत मराठीसोबतच हिंदी चित्रपटांच्या प्रांतातही मनसोक्त मुशाफिरी करणारे... मुशाफिर सचिन पिळगावकर... अभिनयासोबतच निर्माते, दिग्दर्शक, संकलक, गायक ते अगदी संगीतकार अशा नानाविध क्षेत्रांवर त्यांनी यशाची छाप सोडलीय. आपल्या कारकिर्दीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केल्यानंतर सचिनजी आजही त्याच जोमात आणि जोशात पुढे वाटचाल करीत आहेत.
अधिक वाचा - व्हिडिओ: शंकर महादेवन अभिनेत्याच्या भूमिकेत पहिल्यांदाच
सचिन आता तयार झालेत ते 'मराठी रंगभूमीवरचा मैलाचा दगड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका दमदार भूमिकेसाठी... मराठी नाट्यसंगीतामध्ये अजरामर असलेलं नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली. यातील खाँ साहेब हे पात्र आपल्या अभिनयाने आणि सदाबहार गायकीने रंगवलं होतं सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित वसंतराव देशपांडे यांनी... याच नाटकावर आधारित ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यामध्ये खाँ साहेबांच्या भूमिकेत आपल्याला सचिन दिसणार आहे. त्यांचा या चित्रपटातील हा लूक नुकताच एका विशेष कार्यक्रमात सादर करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक सुबोध भावे, एस्सेल व्हिजनचे नितीन केणी आणि निखिल साने यांच्यासह सचिन यांचे कुटुंबियही उपस्थित होते.
'या भूमिकेसाठी सुबोध भावेंनी माझ्या नावाचा विचार केला हा माझ्यासाठी आश्चर्याचा पण सुखद धक्का होता. या भूमिकेद्वारे मी माझ्या ५२ वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच अशी नकारात्मक छटा असलेली भूमिका करत आहे. कारकिर्दीच्या या टप्यावर ही भूमिका मिळणं हे मी एक अतिशय महत्त्वाचं वळण समजतो. ही भूमिका दोन गोष्टींसाठी माझ्या अतिशय जवळची आहे एक म्हणजे संगीतावरचं प्रेम आणि दुसरी म्हणजे ऊर्दू भाषेची गोडी... खाँ साहेब हे पात्र बरेली शहरातलं असल्यामुळे या चित्रपटात मी पूर्णपणे केवळ ऊर्दू भाषा बोललो आहे. प्रभावी संवाद आणि सोबतीला अर्थूपर्ण शायरी यानं ही व्यक्तिरेखा सजलेली आहे' अशी आपली भावना सचिन यांनी यावेळी बोलून व्यक्त केलीय.
अधिक वाचा - शंकर महादेवनचं 'सूर निरागस हो' हिट, अवघं बॉलिवूड पडलं प्रेमात
यावेळी सचिनजींच्या पत्नी सुप्रिया, मुलगी श्रिया आणि त्यांच्या आईनेही या भूमिकेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाद्वारे अभिनता सुबोध भावे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. चित्रपटात सचिन, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर १३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.