मुंबई : बॉलिवूडचा सर्वात नामांकित बंगल्यांपैकी एक म्हणजे स्वर्गीय राजेश खन्नांचा ‘आशीर्वाद’ बंगला... याच बंगल्याची 95 कोटींना विक्री करण्यात आल्याचं समोर आलंय.
मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, एका बिझनेसमननं हा बंगला खरेदी केलाय. राजेश खन्ना यांच्या मृत्यूनंतर हा बंगला त्यांच्या मुली ट्विंकल आणि रिंकी खन्नाच्या नावावर होता.
मात्र, राजेश खन्नांसोबत अनेक दिवस ‘लिव्ह इन’मध्ये राहत असलेल्या अनिता अडवाणींनी बंगल्याच्या विक्रीला आक्षेप घेतलाय. आपल्या मृत्यूनंतर बंगल्याचं रुपांतर एका म्युझियममध्ये करण्यात यावं अशी राजेश खन्नांची इच्छा असल्याचं अनिता अडवाणी यांचं म्हणणं आहे. बंगला विक्रीला आपला विरोध असून आपण याविरोधात नोटीस पाठवणार असल्याचं अनिता अडवाणींनी म्हटलंय.
कायद्यानुसार, प्रॉपर्टी विकल्यानंतर 14 दिवसांच्या आत याविरुद्ध दावा सादर केला जाऊ शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्टर रोड स्थित समुद्र किनाऱ्याजवळचा हा बंगला आता मुंबईचे उद्योगपती आणि ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनीचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन शशि किरण शेट्टी यांनी विकत घेतलाय. दरम्यान, शेट्टी यांच्याकडून याबद्दल अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.
जुलै 2012 मध्ये अभिनेते राजेश खन्ना यांचं निधन झालं होतं. तेव्हापासून या बंगल्याबद्दल आणि राजेश खन्ना यांच्या इतर प्रॉपर्टीवर कुटुंबीय आणि अनिता अडवाणी यांच्यात वाद निर्माण झालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.