मुंबई : आमिर खानचा आगामी चित्रपट 'दंगल' लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. परंतु, या चित्रपटावरून आत्ताच वाद सुरू झालाय.
यंदाच्या वर्षातील हा सर्वात मोठा सिनेमा डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी याचा गाजावाजाही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रसिद्धीचा एक भाग म्हणून या चित्रपटातील 'हानिकारक बापू' हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं होतं. या गाण्यावर एका संस्थेनं आक्षेप नोंदवत या गाण्याला विरोध केलाय.
'विश्वात्मक सामाजिक सेवा ट्रस्ट' नावाच्या एका एनजीओनं हा विरोध केलाय. 'हानिकारक बापू' या गाण्यातील 'बापू' या शब्दावर आक्षेप नोंदवलाय.
ट्रस्टच्या अध्यक्षांनी सिनेमाच्या निर्मात्यांकडे या गाण्यातून 'बापू' हा शब्द वगळण्याची मागणी केलीय. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरानं 'बापू' म्हटलं जातं. त्यामुळे, हे गाणं जो कुणी ऐकतो त्याच्यासमोर पहिल्यांदा महात्मा गांधींची प्रतिमा येते, असं या संस्थेचं म्हणणं आहे.
गाण्यात मात्र मुली आपल्या वडिलांना उद्देशून 'बापू' हा शब्द वापरताना दिसतात. एनजीओनं अभिनेता आमिर खानकडे आपलं निवेदन दिलं होतं. परंतु, आमिरनं मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणं टाळलं. 'दंगल' सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारीनं केलंय.