'बाईचं दुखणं,बाईलाच कळतं', 'माझे पती सौभाग्यवती' 28 सप्टेंबरपासून झी मराठीवर

झी मराठी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर मालिका बनवत असते. नातेसंबंध त्यातील मधुरता, प्रेम कसं टिकवून ठेवायचं हे सांगण्याचा प्रयत्न या मालिकांमधून होत असतो. अशीच एक नवी मालिका 'माझे पती सौभाग्यवती' येत्या 28 सप्टेंबरपासून झी मराठीवर सुरू होतेय. 

Updated: Sep 24, 2015, 03:44 PM IST
'बाईचं दुखणं,बाईलाच कळतं', 'माझे पती सौभाग्यवती' 28 सप्टेंबरपासून झी मराठीवर title=

मुंबई: झी मराठी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर मालिका बनवत असते. नातेसंबंध त्यातील मधुरता, प्रेम कसं टिकवून ठेवायचं हे सांगण्याचा प्रयत्न या मालिकांमधून होत असतो. अशीच एक नवी मालिका 'माझे पती सौभाग्यवती' येत्या 28 सप्टेंबरपासून झी मराठीवर सुरू होतेय. 

मालिकेचं कथानक

या मालिकेची कथा आहे वैभव मालवणकर या स्ट्रगलर अभिनेत्याची.  एक मोठा नट बनण्याचं स्वप्न घेऊन तो या मुंबईत आलाय. अनेक वर्षे संघर्ष करूनही मनासारखं काम तर मिळालच नाही उलट वाट्याला आली ती अपमानास्पद वागणूकच. याही परिस्थितीत मात्र खचून न जाता तो आपलं स्वप्न उराशी बाळगून या स्वप्ननगरीत रोज धक्के खातोय. त्याच्या या संघर्षामध्ये त्याच्या प्रत्येक पावलावर त्याची मनोभावे साथ देतेय ती त्याची पत्नी लक्ष्मी. आपल्या पतीनं खूप नाव कमावावं आणि मोठा अभिनेता व्हावं हे तिचंही स्वप्न. त्याच्या या स्वप्नपूर्तीसाठी काटकसरीचा संसार ती मोठ्या नेटानं चालवतेय. 

याच दरम्यान वैभवच्या आयुष्यात एक अशी घटना घडते ज्याद्वारे अभिनयाच्या संधीचं एक मोठं दार उघडतं. पण संघर्ष हा जणू त्याच्या जगण्याचा अविभाज्य भागच बनलाय त्यामुळं या संधीसोबतच येतो एक आगळा वेगळा संघर्ष तो म्हणजे स्वतःची मूळ ओळख लपविण्याचा. हाडाचा अभिनेता असलेल्या या नटाला जी मोठी भूमिका मिळते ती असते एका स्त्री पात्राची. अभिनेता म्हणून ओळख कमवायला आलेल्या वैभवला पहिल्यांदाच एक मोठी भूमिका मिळते पण तीही स्वतःची ओळखच मिटवून टाकणारी. पण हे आव्हान स्वीकारून स्वतःच्या अभिनेता या ओळखीबरोबरच या पात्राची नवी ओळख निर्माण करतो का? आपल्या दैनंदिन आयुष्यात बाईचं अस्तित्व दुर्लक्षित करू पाहणाऱ्या त्याच्या आयुष्याला या कामामुळं कलाटणी मिळते का? त्याच्या स्वप्नांची पूर्तता होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील 'माझे पती सौभाग्यवती' या मालिकेतून.

'होणार सून मी ह्या घरची' या लोकप्रिय मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक असलेल्या मंदार देवस्थळी यांच्या अल्ट्रा क्रिएशन्स या संस्थेनं या मालिकेची निर्मिती केली आहे. ज्यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले हे वैभव मालवणकरच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत तर पत्नी लक्ष्मीच्या भूमिकेत नंदिता धुरी ही अभिनेत्री बघायला मिळणार आहे. याशिवाय अशोक शिंदे, रमेश भाटकर, उदय सबनिस, स्नेहा माजगावकर, अद्वैत दादरकर असे अनेक लोकप्रिय कलाकारही या मालिकेत असणार आहेत.

केवळ बाईचं मन समजून घेण्याचा नाही तर तिच्या अंतरंगात डोकावण्याचा अतिशय वेगळा प्रयत्न 'माझे पती सौभाग्यवती' या मालिकेमधून होणार आहे. येत्या २८ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा ही मालिका प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे फक्त झी मराठीवर.

पाहा व्हिडिओ - 

 

ट्रेलर - 
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.