फिल्म रिव्ह्यू : 'कँन्डल मार्च'... लढा अन्यायाविरोधातला!

कॅन्डल मार्च (मराठी)

Updated: Dec 5, 2014, 06:44 PM IST
फिल्म रिव्ह्यू : 'कँन्डल मार्च'... लढा अन्यायाविरोधातला! title=

सिनेमा : कॅन्डल मार्च (मराठी)
दिग्दर्शक : सचिन देव
कलाकार : तेजस्विनी पंडित, स्मिता तांबे, मनवा नाईक, सायली सहस्त्रबुद्धे, आशिष पाथाडे, निलेश दिवेकर 
संगीत : अमृतराज

 
पुरुषप्रधान समाजासोबत चालू असलेला चार स्त्रियांचा लढा म्हणजेच 'कॅंडल मार्च' हा सिनेमा... शबाना, अनुराधा जोगळेकर, विद्या सावंत आणि सखी या चार व्यक्तीरेखांभोवती फिरणारी या सिनेमाची कथा... स्मिता तांबे, मनवा नाईक, तेजस्विनी पंडीत आणि नवोदित अभिनेत्री सायली सहस्त्रबुद्धे या चौघींनी यात प्रमुख भूमिका बजावल्यात. 

'सखी' या मुलीवर चार जण सामूहिक बलात्कार करतात आणि त्यानंतर सुरु होतो तिचा लढा... पण तिच्या लढ्यात ती एकटी नसून, तिला साथ मिळते शबाना, अनुराधा, आणि विद्या या तिघींची... सखी या मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका आरोपीच्या पत्नीची व्यक्तिरेखा म्हणजेच शबाना साकारली आहे अभिनेत्री स्मिता तांबेनं... अनुराधा जोगळेकर अर्थातच बलात्कार पीडितच्या प्रोफेसरची भूमिका निभावलीय तेजस्विनी पंडितनं... जी खरंतर स्वत: जळगाव सेक्स स्कँडलची पीडित असते... या सगळ्या जणी कुठेनंकुठे लैंगिक अत्याताराच्या बळी पडलेल्या आहेत... जेव्हा या चौघी जणी एकत्र येतात आणि अन्यायाविरोधात आवाज उठवतात तेव्हा काय घडतं.. अशा काहीशा पार्श्वभूमिवर आधारीत 'कँडल मार्च' हा सिनेमा आहे. 
 
अभिनय : 
या सिनेमातल्या चार मुख्य भूमिका साकारणाऱ्यांपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडीतनं तिच्या आजवरच्या करीयरमधली एक अत्यंत वेगळी भूमिका या सिनेमाच्या निमित्तानं साकारलीय. तिनं साकारलेली अनुराधा जोगळेकर पाहिल्यानंतर कुठेतरी 'नो वन किल्ड जेसिका' या सिनेमातल्या विद्या बालनची झलक आठवते. एक अत्यंत साधी सरळ हळू आवाजात बोलणारी मिडल क्लास मराठी घरातली मुलगी तिने यात साकारली आहे... तेजस्विनीनं या भूमिकेला नक्कीच न्याय दिलाय यात काहीच शंका नाही... तिची बॉडी लँग्वेज, तिचा अंदाज या सगळ्या गोष्टीसाठी तेजस्विनीला शंभर पैंकी शंभर मार्क... 
 
यातली दुसरी महत्वाची भूमिका म्हणजे स्मिता तांबेनं साकारलेली शबाना... एका बलात्कार आरोपीच्या पत्नीची व्यक्तिरेखा यात स्मितानं साकारली आहे. मुस्लिम कॅरेक्टर असल्यामुळे तिचे बहुतेक संवाद हिंदीतच आहेत.  स्मितानं आजवर साकारलेल्या शेड्सपैकी खूप वेगळा असा हा रोल नाहीय पण स्मिताच्या अभिनय लाजवाब आहे, असंच म्हणावं लागेल.
 
याचबरोबर मनवा नाईकनं रेखाटलेली विद्या सावंतही चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही.  मनवानं रेखाटलेली 'क्राईम रिपोर्टर' या भूमिकेला खरंतर तसा फारसा वाव नाही... परफॉर्मन्समध्येही तिला फार काही करण्यासारखं नाही आणि म्हणून तिनं जे काही केलंय ते बरंय असंच म्हणावं लागेल...

दिग्दर्शन : 
सचिन देव यांनी 'कँडल मार्च' या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. सिनेमाची सुरुवात चांगली झालीय. सिनेमाला न्याय देण्यातही त्यांना बऱ्यापैंकी यश आलंय. पण काही ठिकाणी काही गोष्टी वारंवार आणि नकोशा वाटतात, ज्या खरं तर टाळता आल्या असत्या. त्याच त्याच गोष्टींचा ओव्हरडोस झाल्यामुळे सिनेमा काही ठिकाणी बोअरिंग वाटतो. 

संगीत : 
संगीतकार अमितराजनं सिनेमाला संगीत दिलंय.  गाणी छान आहेत. विशेष करुन यातलं 'निखारे' हे गाणं सिनेमाच्या थीमसोबत जाणारं आहे.  'कँडल मार्च'चं बॅकग्राऊंड स्कोअरही उत्तम झालंय. 
 
शेवटी काय तर...  
काही अपवाद वगळता 'कँडल मार्च' हा एक चांगला सिनेमा आहे. विशेष करुन या सिनेमातल्या सगळ्यांच्या भूमिका पाहता आम्ही या सिनेमाला देतोय तीन स्टार्स...
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.