प्रसिद्धीसाठी दीपिकाचं ढोंग; 'क्लिव्हेज' प्रकरणात टाईम्सचा पलटवार

या प्रकरणामुळे पुरतं बदनामी झालेल्या वृत्तपत्र समूहानं मात्र या प्रकरणात आता ‘दीपिका, आमचा पॉईंट ऑफ व्ह्यू’ नावानं आणखी लेख जाहीर करून या आगीत तेल ओतण्याचंच काम केलंय. 

Updated: Sep 22, 2014, 06:32 PM IST
प्रसिद्धीसाठी दीपिकाचं ढोंग; 'क्लिव्हेज' प्रकरणात टाईम्सचा पलटवार title=

नवी दिल्ली : दीपिका पादूकोण हिनं ‘क्लिवेज’ प्रकरणावर आपलं म्हणणं सोशल वेबसाईट फेसबुकवर मांडल्यानंतर आता हे प्रकरण इथेच थांबेल असं वाटत होतं. मात्र, या प्रकरणामुळे पुरतं बदनामी झालेल्या वृत्तपत्र समूहानं मात्र या प्रकरणात आता ‘दीपिका, आमचा पॉईंट ऑफ व्ह्यू’ नावानं आणखी लेख जाहीर करून या आगीत तेल ओतण्याचंच काम केलंय. 

‘टाईम्स’ समूहानं दीपिकाचे काही जूने ‘बोल्ड’ फोटो पुन्हा टाकून दीपिकाला उत्तर दिलंय. या लेखात टाईम्स ऑफ इंडियानं या संपूर्ण प्रकरणाला ‘दीपिकाचं ढोंग’ असल्याचं म्हटलंय. एकप्रकारे आपण जे केलं ते योग्यच होतं, हे सिद्ध करण्याचा वृत्तसमूहानं अट्टहास केल्याचं दिसतंय. पण, यावरही नेटिझन्सनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. 

दीपिकानं फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त करताना ‘जे मी ऑनस्क्रीन करते ती रिअल नाही तर रील लाईफ आहे... आणि ही माझी ऑनस्क्रीन भूमिका आहे... रिअल आणि रील लाईफमध्ये फरक समजून घेण्याची गरज आहे’ असं म्हटलं होतं. यावर, मॅगझीनमध्ये याआधीच छापलेले दीपिकाचे काही फोटो शेअर करत टाईम्स वेबसाईटवर ‘त्यावेळेस काय जेव्हा तूच अनेक वेळा आपल्या शरीराचं प्रदर्शन केलंय... डान्स करताना किंवा एखाद्या मॅगझीनसाठी पोझ करताना आणि सिनेमांच्या प्रमोशनल इव्हेंटमध्येही... त्यावेळी तू कोणती भूमिका निभावत असते? तर मग आत्ताच हे ढोंग का?’ असा प्रश्न विचारलाय.

‘ट्विटरवर आपलं म्हणणं मांडण्याऐवजी प्रत्येक मॅसेज रिट्विट केलास आणि या मुद्यावर खूप सारे इंटरव्ह्यूही दिले. उघड आहे, की यामुळे तुला खूप सारी पब्लिसिटीही मिळाली असेल. नव्या सिनेमाच्या रिलीजसोबत याचं टायमिंगही अचूक जमून आलंय. संबंधित व्हिडिओ यू-ट्यूबवर एक वर्षांहूनही जास्त जूना आहे, मग आत्ताच यावर आक्षेप का?’ असा प्रश्न टाईम्सनं दीपिकाला विचारलाय.

महत्त्वाचं म्हणजे, दीपिकानं पहिल्यांदा आक्षेप घेतल्यावर, वृत्तसमूहानं दीपिकाला समजावण्याच्या सुरात, ‘दीपिका आम्ही तुझी स्तुती करतोय. तू खूप सुंदर दिसतेय हेच जगाला आम्ही दाखवून देतोय’ असं म्हणत पडदा पाडण्याचा प्रयत्न केला होता. आता, टाईम्सच्या या पलटवारावर दीपिका काय पाऊल उचलतेय हे पाहणं उत्सुकतेचं ठरलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.