बंगळुरु : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न गेली कित्येक वर्ष प्रलंबित आहे. यावरून वाद सुरुच आहे. हा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात आहे. मात्र, सीमाप्रश्नावर आधारित मराठी 'टायगर्स' सिनेमा काढण्यात आलाय. यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालाय.
कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटलेय, या चित्रपटाचे प्रदर्शन आम्ही थांबवू शकत नाही आणि जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर त्यासंदर्भात सरकारने पावले उचलायला हवीत. याबाबतचा निकाल मुख्य न्यायाधीश सुभ्रो कमाल मुखर्जी आणि न्यायाधीश रवी मलिमथ यांनी दिलाय.
कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये अनेक दशकांपासून सीमाप्रश्न धगधगत आहे. या प्रश्नाला हात घालणारा हा सिनेमा असून तो ५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ग्रीन सिग्नल दिला असून त्यावेळी कर्नाटक सरकारचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
सीमाप्रश्नावर महाराष्ट्रविरोधी असलेल्यांनी कोर्टात याचिका करून प्रदर्शनास बंदी घालण्याची विनंती केली होती, जी फेटाळण्यात आली आहे. आता, राज्य सरकारने सीमाभागामध्ये हा चित्रपट दाखवू दिला नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागू अशी भूमिका निर्माते अभिजीत तहसीदार यांनी घेतली आहे.