मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठे अभिनेते ओम पुरी यांचं शुक्रवारी सकाळी निधन झालंय.
मृत्यूसमयी ते 66 वर्षांचे होते. हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यानं त्यांचं निधन झालंय. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या बातमीनं बॉलिवूडला धक्का बसलाय.
ओम पुरी हे नुकतेच 'अॅक्टर इन लॉ'मध्ये दिसले होते. नबील कुरैशी दिग्दर्शित हा उर्दू सिनेमा 13 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता.
याशिवाय, अर्ध सत्य, जाने भी दो यारो, नसूर, मेरे बाप पहले आप, देहली 6, मालामाल विकली, डॉन, रंग दे बसंती, दीवाने हुए पागल, क्यूँ! हो गया ना, काश आप हमारे होते, प्यार दीवाना होता है अशा अनेक चित्रपटांत ओम पुरी यांनी महत्त्वाच्या भूमिका निभावल्या होत्या.
ओम पुरी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 मध्ये हरियाणाच्या अम्बाला शहरात झाला होता. त्यांचं प्राथमिक शिक्षण पंजाबच्या पटियालामध्ये झालं होतं. 1976 साली त्यांनी पुण्यातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं... त्यानंतर त्यांनी 'मजमा' नावाच्या खाजगी थिएटरची स्थापना केली होती.
उल्लेखनीय म्हणजे, ओम पुरी यांनी सिनेक्षेत्रातील आपल्या करिअरची सुरुवात 'घाशीराम कोतवाल' या मराठी सिनेमातून केली होती.