कराकस : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महिन्यापूर्वी नोटबंदीचा निर्णय घेतला आणि देशासह अनेक देशांना या निर्णयाचा धक्का बसला. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं. त्यानंतर आता वेनेजुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी देखील देशातील मोठी नोट म्हणजेच 100 बोलिवरच्या नोटेवर बंदी आणली आहे.
वेनेजुएलाचे राष्ट्राध्यक्ष यांनी कोलंबियातील माफियांवर आरोप केले आहेत की त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात काळा पैसा आहे. त्यांच्यावर अकुंश आणण्यासाठी त्यांनी रविवारी हा निर्णय घोषित केला. आर्थिक संकट आणि महागाईची झळ सोसणाऱ्या वेनेजुएला सरकारने नव्या नोटा आणि नाणे आणण्यासाठी तयारी केली आहे.
वेनेजुएलामधील १०० बोलिवरच्या नोटेची किंमत सध्या एका डॉलरच्या तीन सेंट्सपेक्षा थोडी कमी आहे. म्हणजेच एका १०० बोलिवरच्या नोटेत एक चॉकलेट येईल इतकी त्याची किंमत डॉलरच्या तुलनेत कमी आहे. ७२ तासात त्यांनी १०० बोलिवरच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलंबिया आणि ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात १०० बोलिवरच्या जुन्या नोटा छापल्या गेल्याची त्यांना माहिती आगहे. देशात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर नाकाबंदी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत कारण तो पैसा पुन्हा देशात आणता येऊ नये.