लंडन : सौर उर्जेवर चालणारी टमटम भारतातून निघालेली रिक्षा इंग्लंडच्या रस्त्यावर धावली आणि सायबांना आश्चर्याचा धक्काच बसला.
सौरऊर्जेवर चालणाऱ्या छोटयाशा टमटम रिक्षामधून सुमारे ६ हजार २०० मैलांचा प्रवास करुन भारतीय वंशाचा इंजिनीयर ब्रिटनमध्ये दाखल झालाय. नवीन राबेली असं या इंजिनीयरचं नाव आहे. ३५ वर्षाच्या नवीनने भारतातून प्रवासाला सुरुवात केली होती.
अनेक देशांमध्ये सौरऊर्जेवर चालणाऱ्या या टमटम रिक्षाची कल्पना आवडल्याचं तो म्हणतोय. खासकरुन इराणचे लोक या रिक्षाच्या प्रेमात पडल्याचं तो म्हणाला.
नवीन राबेली हा जन्माने भारतीय असला तरी, तो ऑस्ट्रेलियाचा रहिवासी आहे. इंग्लंडच्या बकिंगहॅम पॅलेसजवळ तो आपला प्रवास संपवणार आहे.
वीजेवर, सौरऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांचा अधिक वापर व्हावा, त्याबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी राबेलीने टमटमनं प्रवास केलाय. यासाठी त्यानं या रिक्षामध्येच सर्व व्यवस्था केलीय. ज्यात एक बिछाना, कपाट आणि सौर ऊर्जेवर चालणारा एक कुकरदेखील आहे.
एकदा भारतात ट्रॅफीकमध्ये अडकलो असताना प्रदूषण पाहून सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा बनवण्याची कल्पना सुचल्याचं त्यांनी सांगितलं..