लंडन : 'सेल्फी'चं भूत तरुणाईवर कोणत्या प्रमाणात चढलंय... याचे काही किस्से वाचून तुम्ही हैराण झाला असाल. असाच एक 'सेल्फी' पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. या सेल्फीमध्ये एका मुलानं आपल्या मृत आजोबांच्या बाजुला उभं राहून हसत आणि जीभ बाहेर काढत सेल्फी काढलाय.
'डेली मेल' या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, या तरुणानं काढलेल्या या सेल्फीत त्याच्या बाजुला त्याचे मृत आजोबा दिसत आहेत... सोशल मीडियावर पोस्ट करताना या तरुणानं फोटोला 'अलविदा दादा' अशी कॅप्शनही दिलीय.
सौदी अरबमध्ये ही घटना घडलीय. आपल्या मृत आजोबांसोबत सेल्फी काढून या तरुणानं हा फोटो सोशल मीडियावर शेअरही केला. त्यानंतर मात्र त्याला बऱ्याच तिखट प्रतिक्रिया मिळाल्यात. या तरुणाच्या या असंवेदनशील व्यवहारावर लोकांना बरंच आश्चर्यही वाटलंय.
इतकंच नाही तर सौदी अरब प्रशासनाला याबद्दल तक्रार मिळाल्यानंतर याबद्दल चौकशीही सुरू झालीय. तक्रारकर्त्यांनी हा प्रकार अनैतिक आणि अयोग्य असल्याचं म्हटलंय. हॉस्पीटलच्या कर्मचाऱ्यांनी या तरुणाला असा सेल्फी काढण्याची परवानगी दिलीच कशी असाही प्रश्न चौकशी समितीसमोर उपस्थित करण्यात आलाय. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं प्रशासनानं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.