पनामा पेपर लिकमध्ये आणखी 3 अभिनेते ?

पनामा पेपर घोटाळ्यामध्ये आता आणखी नावं समोर येत आहेत. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यापाठोपाठ सैफ अली खान, करीना कपूर, करिश्मा कपूर, व्हिडिओकॉन इंडस्ट्रीचे वेणुगोपाल धूत यांचं नाव असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. 

Updated: Apr 7, 2016, 10:00 PM IST
पनामा पेपर लिकमध्ये आणखी 3 अभिनेते ? title=

मुंबई: पनामा पेपर घोटाळ्यामध्ये आता आणखी नावं समोर येत आहेत. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यापाठोपाठ सैफ अली खान, करीना कपूर, करिश्मा कपूर, व्हिडिओकॉन इंडस्ट्रीचे वेणुगोपाल धूत यांचं नाव असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. 

सैफ आणि करीना यांची कंपनीमध्ये ओबडुरेट लिमिटेड नावाच्या कंपनीनं हिस्सेदारी केली होती. जी टॅक्स हेवन देश ब्रिटीश वर्जिन आइसलँडमध्ये रजिस्टर होती, असा आरोप करण्यात येत आहे. 

काय आहे मोझॅक फोन्सेका?

पनामा या देशाला करचुकव्यांचा स्वर्ग असं म्हटलं जातं. याच देशातील एक कायदेशीर कंपनी मोझॅक फोन्सेका ही खोट्या कंपन्यांच्या मार्फत विविध लोकांना त्यांचे पैसे या कंपन्यांमध्ये गुंतवायला मदत करते. हे करताना गोपनीयतेची सर्वात मोठी हमी दिली जाते. 

खरं तर परदेशात पैसे गुंतवणं बेकायदेशीर नाही. मात्र, प्रत्येक देशात कर भरण्यासाठी किंवा परदेशात पैसा गुंतवण्यासाठी काही नियम आणि अटी असतात. त्या मोडून परदेशात पैसा गुंतवून तो वाढवण्याचे उद्योग या कंपनीतर्फे केले जातात.  

काय आहेत 'पनामा पेपर्स'? 

जगभरातील ७८ देशांतील वृत्तसमूहांच्या एका गटाने एकत्र येऊन या कंपनीचा डाटा उघड करण्याचा घाट घातला. यात त्यांच्या हाती २.६ टेराबाईट इतका प्रचंड गोपनीय कागदपत्रांचा साठा हाती लागला. भारतातील 'द इंडियन एक्सप्रेस' या वृत्तपत्रातील पत्रकारांच्या एका गटाचा यात समावेश होता. गेले आठ महिने हे पत्रकार या सर्व कागदपत्रांचे वाचन करत होते. तब्बल १ कोटी १० लाख पानांचे वाचन करण्यात आले. कोणी, कोणाच्या नावे आणि कोणत्या कंपनीत पैसा गुंतवला आहे याची माहिती यातून पुढे आली. हे सर्व काम अतिशय गुप्त पद्धतीने करण्यात आले.