www.24taas.com, झी मीडिया, लंडन
ब्रिटनच्या राजघराण्याचा दुसरा वारस प्रिन्स विल्यम यांचं भारताशी रक्ताचं नातं आहे. होय, हे खरं आहे. प्रिन्स विल्यम यांच्या डिएनए चाचणीत भारतीय जिन्स असल्याचं शास्त्रज्ञांनी उघड केलंय.
प्रिन्स विल्यम यांचं भारताशी नातं हे त्यांच्या आजोळकडून म्हणजेच प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी यांची आई डायना हेडन यांच्याकडून आहे. डायना हेडनच्या पूर्वजांपैकी सातव्या पिढीतल्या एकाचा भारतीय वंशाच्या स्त्रीशी संबंध आला होता. त्यातूनच हा जिन त्यांच्यात आल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. डायनाचे हे पूर्वज सुरतमध्ये स्थायिक होते, असंही आढळून आलंय. एडिनबर्ग विद्यापीठातील अनुवंश शास्त्रज्ञ जीम विल्यम्स व ब्रिटन डीएनए नावाच्या एका संघटनेने प्रिन्स विल्यम व त्यांच्या एक नातेवाइकाच्या लाळेचे परीक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष काढला. अर्थात यासाठी नेमक्या कुठल्या नातेवाइकाच्या लाळेचे नमुने घेण्यात आले, याची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
या स्थितीत विल्यम जर राजगादीवर विराजमान झाले तर भारताशी रक्ताचे नाते असलेले ते ब्रिटनचे पहिले राजा ठरतील. प्रिन्स विल्यम त्यांच्या पहिल्या बाळाच्या जन्मानंतर भारत दौऱ्यावर येणार आहेत. डीएनए तपासात विल्यमला त्यांच्या आईकडून खानदानी वारसरूपात भारतीय अंश आढळून आले. स्कॉटलंडमधील संशोधकांनुसार हा डीएनए आईकडून तीन पिढ्यांत मुलींत जातो. नंतर मुलांमध्येही तो आढळतो. पुढील पिढीत मात्र तो दिसत नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.