भारतात प्रवेश करायचाय तर पोलिओ लस अनिवार्य!

१५ मार्चपासून पाकिस्तानातून भारतात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पोलिओची लस घेतल्याचं प्रमाणपत्र देणं अनिवार्य असेल, अशी घोषणा आज भारतानं केलीय. त्यामुळे पोलिओमुक्त भारतात पुन्हा या रोगाचा शिरकाव होणार नाही.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 12, 2014, 02:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद
१५ मार्चपासून पाकिस्तानातून भारतात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पोलिओची लस घेतल्याचं प्रमाणपत्र देणं अनिवार्य असेल, अशी घोषणा आज भारतानं केलीय. त्यामुळे पोलिओमुक्त भारतात पुन्हा या रोगाचा शिरकाव होणार नाही.
पाकिस्तानातून आलेल्या यात्रेकरूंना लसीकरण प्रमाणपत्र सादर करावं लागेल... हे प्रमाणपत्र व्हिजासोबत परत केलं जाईल.
भारताच्या उच्चआयोगाद्वारे जाहीर केल्याप्रमाणे, पाकिस्तानात राहणाऱ्या पाक नागरिकांना भारतात प्रवास करायचा असेल तर १५ मार्च २०१४ नंतर व्हिजा मिळवण्यासाठी पोलिओ लसीकरणाचं प्रमाणपत्र सोबत जोडावं लागेल. भारतात जाण्याअगोदर कमीत कमी चार आठवडे अगोदर त्यांनी पोलिओची लस घेतलेली असेल.
सध्या पोलिओ अस्तित्वात असणाऱ्या सर्व देशांना हा नियम लागू राहील. पाकिस्तानात गेल्या वर्षी ९० पेक्षा जास्त जणांना पोलिओ आढळून आला होता. पोलिओची ही समस्या अजूनही तीन देशांमध्ये कायम आहे... त्यापैंकीच पाकिस्तान एक आहे.
तालिबानचा आणि दहशतावाद्यांचा पोलिओ लसीकरणाला तीव्र विरोध आहे. मुस्लिमांना पोलिओ लसीमुळे वंध्यत्व येतं, असा त्यांचा आरोप आहे.
भारताच्या या निर्णयानंतर पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्या निवासस्थानी एक तातडीची बैठक बोलावली. शरीफ यांनी, पाकिस्तानात आढळलेल्या विषाणुंमुळे इतर देश पाकच्या प्रवासांवर अटी लादण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलीय. ही एक गंभीर बाब असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.