www.24taas.com, इस्लामाबाद
‘भारतानं अजमल कसाबच्या फाशीसंदर्भातील निर्णयाचं पत्र पाठवलं होतं आणि आम्ही त्याचा स्वीकारही केला’ असं म्हणत पाकिस्ताननं भारतानं केलेला दावा फेटाळून लावलाय. केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘भारतानं अजमल कसाबच्या शिक्षेसंदर्भात माहिती देणारं पत्र पाकिस्तानला पाठवलं होतं परंतू पाकिस्ताननं मात्र हे पत्र स्वीकारलं नव्हतं’. हाच दावा पाकिस्ताननं फेटाळलाय.
पराराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मुअज्जम खान यांनी आज सकाळी कसाबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करत, ‘इस्लामाबादनं नेहमीच कोणत्याही स्वरुपातील दहशतवादाचा तिरस्कारच केलाय. आम्ही दहशतवादाला मुळापासून उपटून टाकण्यासाठी सगळ्याचं देशांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे’ असं म्हटलं होतं. ‘कसाबला फाशी देण्यात येणार आहे याबद्दल पाकिस्तानला आम्ही पत्र पाठवून अगोदरच कळवलं होतं. पण इस्लामाबादनं मात्र पत्र स्वीकारण्यास नकार दिला’ या भारताच्या दाव्याला खोडून काढत त्यांनी ‘या बातम्या चुकीच्या आणि कोणत्याही पुराव्याविना’ असल्याचं म्हटलंय. भारतीय उप उच्चायुक्त मंगळवारी संध्याकाळी कसाबला दिल्या जाणाऱ्या फाशीसंदर्भातील नोट घेऊन परराष्ट्र कार्यालयात आले होते. तसंच परराष्ट्र मंत्रालयात ‘दक्षिण आशिया’चे विभागाच्या महानिर्देशकांनी ही नोट स्वीकारली, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.
मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या १० पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आलं होतं. ‘लष्कर ए तय्यबा’कडून प्रशिक्षण घेणारे इतर नऊ दहशतवादी मात्र यावेळी मारले गेले होते. या हल्ल्यात १६६ जण मृत्यूमुखी पडले होते. याचसंदर्भात पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी लष्कर ए तय्यबाचा कमांडर जकीऊर रहमान लक्वी याच्याबरोबरच इतर सात जणांना अटक केली होती. त्यांच्याविरोधार कट रचनं, दहशतवाद्यांना आर्थिक मदत देणं इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. पाकिस्तानातील रावळपिंडीमध्ये या दहशतवाद्यांवर खटलेदेखील सुरू आहेत. पण तांत्रिक कारणांमुळे या प्रकरणाची कारवाई वेळोवेळी स्थगित झालीय.