नवी दिल्ली : देशात ५ राज्यांच्या विधानसभा निकालानंतर चार राज्यांमध्ये भाजपने मोदींच्या नेतृत्वात मोठं यश मिळवलं. अमेरिका, ब्रिटेन, फ्रांस, रूस आणि मिडिल ईस्टच्या मोठ्या मोठ्या वृत्तपत्रांमध्ये मोदींच्या चर्चा आहेत. भारताचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी चीनने देखील मोदींचं कौतूक केलं आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने त्यांच्या संपादकीयमध्ये उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये जबरदस्त विजयाबाबत मोदींचं कौतूक केलं आहे.
ग्लोबल टाइम्सने लिहिलं आहे की, पीएम मोदींनी ज्या प्रकारे सत्तेवर आपली पकड बनवली आहे यावरुन स्पष्ट आहे की, २०१९ मध्ये त्यांचं पंतप्रधान बनणं निश्चित आहे. सोबतच त्यांनी आशा व्यक्त केली आहे की पंतप्रधान मोदींच्या काळात भारत-चीन सीमावाद सुटू शकेल. ग्लोबल टाइम्सने पंतप्रधान मोदींचं कौतूक करत त्यांना मॅन ऑफ अॅक्शन म्हटलं आहे. वृत्तपत्रानुसार पंतप्रधान मोदी अनेक दिवसांपासून राजकारणात चर्चेत आहेत.
बीजिंग आणि नवी दिल्ली यांच्यातील संबंध काही दिवसांपासून बिघडले आहे. चीन पाकिस्तानच्या मुद्द्यावर भारताच्या विरोधात उभा राहतो. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. चीन हा विश्वास ठेवण्यासारखा देश नाही. चीन त्यांची भूमिका नेहमी बदलत असतो. पण या वृत्तपत्राने दोन्ही देशातील संबंध सुधरावे म्हणून आशा व्यक्त केली आहे.