www.24taas.com, लंडन
पाकिस्तानची युवा कार्यकर्ता मलाला युसूफजई हिची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती ब्रिटनच्या हॉस्पीटलमधील डॉक्टरांकडून देण्यात आलीय. तिच्या प्रकृती झपाट्यानं सुधारतेय. मलाला हिच्या डोक्यात तालिबान्यांनी गोळी मारली होती. त्यानंतर काही दिवसांनी मलालाला पाकिस्तानातून लंडनच्या हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं होतं.
लंडनस्थीत क्वीन एलिजाबेथ हॉस्पीटलमध्ये सध्या मलालावर उपचार सुरू आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय मलालाची प्रकृती आता स्थिर आहे. क्वीन एलिजाबेथ आणि बर्मिंघम या लहाना मुलांच्या हॉस्पीटलमधील तज्ज्ञ मलालावर उपचार करण्यात यशस्वी होत आहेत. मलाला हिचं संपूर्ण कुटुंब अजुनही पाकिस्तानातच आहे. ते लंडनमध्ये मलालाला पाहायला कधी येणार याबद्दल मात्र अजून काहीही माहिती नसल्याचं हॉस्पीटलकडून सांगण्यात येतंय.
जीवाला धोका असल्यामुळे पाकिस्तानातल्या रावळपिंडीतल्या सैन्य हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना मलाला हिला हवाई अम्ब्युलन्सद्वारे क्वीन एलिजाबेथ हॉस्पीटलमध्ये आणण्यात आलं होतं. तालिबानचा गड म्हणून समजल्या जाणाऱ्या स्वात खोऱ्यात मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तालिबान्यांनी मलालाला मृत्यूची सजा जाहीर केली होती. मुलींना शिकवलं म्हणून तिच्या डोक्यात गोळी मारण्यात आली होती. या हल्ल्याची जगभरात निंदा झाली. त्यानंतर योग्य आणि आधुनिक उपचारांसाठी मलाला हिला लंडनमध्ये हलवण्यात आलं होतं.