भारतीय वंशाच्या महिला कमला यांचा अमेरिकन सिनेटमध्ये दिमाखात प्रवेश

कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या महिलेनं अमेरिकेच्या सिनेटमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.  

PTI | Updated: Nov 9, 2016, 10:30 PM IST
भारतीय वंशाच्या महिला कमला यांचा अमेरिकन सिनेटमध्ये दिमाखात  प्रवेश title=

वॉशिंग्टन : कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या महिलेनं अमेरिकेच्या सिनेटमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. कॅलिफोर्नियाच्या अटॉर्नी जनरल म्हणून काम पाहणा-या कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्नियातून निवडणूक लढवत त्यांच्याच डेमोक्रॅटीक पक्षाच्या लोरिटा सॅन्चेझ यांचा पराभव केला.

सिनेट हे अमेरिकेचं वरिष्ठ सभागृह आहे. कमला हॅरिस या सिनेटमध्ये प्रवेश करणा-या भारतीय वंशाच्या पहिल्याच महिला ठरल्यात. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला होता.

क्लिंटन यांचा धक्कादायक पराभव 

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प जिंकले आणि हिलरी क्लिंटन हारल्या. कुणीतरी जिंकलं की कुणीतरी हरणार इतकं हे सोपं नाही. सुरूवातीपासूनच व्हाईट हाऊसच्या प्रबळ दावेदार असलेल्या क्लिंटन यांचा पराभव धक्कादायक खरा, पण अंतर्मुख करायला लावणारा आहे.

डोनाल्ड ट्रम्प नवे अध्यक्ष

तसेच डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकेच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेले पहिले रिअॅलिटी टीव्ही स्टार. ड्विट आयसेनहॉवर यांच्यानंतर थेट व्हाईट हाऊसची पायरी चढणारी पहिली बिगर राजकीय व्यक्ती. ट्रम्प यांच्या विजयामुळे अमेरिकेमध्ये एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे.

अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर धक्कादायक विजय मिळवलाय. विशेष म्हणजे दोघांमध्ये काटें की टक्कर होणार असल्याचं भाकित सर्वांनी वर्तवलं होतं. प्रत्यक्षात मात्र अमेरिकेच्या जनतेनं ट्रम्प यांना भरभरून मतदान केलं. त्यामुळं ट्रम्प यांनी हिलरी यांच्यावर दणदणीत विजय मिळवलाय. इलेक्टोरल मतांमध्ये ट्रम्प यांनी तब्बल 61 मतांची विजयी आघाडी घेत 270 मतांचा जादुई आकडा पार केला.

ट्रम्प यांना 279 तर हिलरी यांना केवळ 218 इलेक्टोरल मतं मिळाली. तर प़ॉप्युलर मतांमध्येही ट्रम्प यांनी हिलरींवर मात केली.  बहुतांश स्वींग स्टेस्ट्स म्हणजे बेभरवशाच्या राज्यांनी ट्रम्प यांना कौल दिला. त्यांमुळं ट्रम्प यांचं पारडं जड झालं.  निकालानंतर ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेचे आभार मानले. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी यांनी त्यांचे फोनवरून अभिनंदन केले.