‘त्या’ 46 नर्सेसची सुटका; उद्या भारतात परतणार

इराकमध्ये चाललेल्या यादवी युद्धात गेल्या अनेक दिवसांपासून अडकून पडलेल्या 46 भारतीय नर्सेसची अखेर सुटका करण्यात आलीय. 

Updated: Jul 4, 2014, 08:45 PM IST
‘त्या’ 46 नर्सेसची सुटका; उद्या भारतात परतणार title=

बगदाद/नई दिल्ली : इराकमध्ये चाललेल्या यादवी युद्धात गेल्या अनेक दिवसांपासून अडकून पडलेल्या 46 भारतीय नर्सेसची अखेर सुटका करण्यात आलीय. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना ‘आयएसआयएस’नं बंदी बनविलेल्या या भारतीय नर्सेसची शुक्रवारी सोडवणूक करण्यात आलीय. यानंतर या नर्सेसना भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवला गेलंय. या नर्सेस आता इराकची सीमा ओलांडत आहेत. शनिवारी सकाळी सात वाजता कोच्चीमध्ये त्या परततील. 

केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराकमध्ये फसलेल्या 46 भारतीय नर्सेसची सुटका झालीय आणि उद्या त्या कोच्चीला दाखल होतील. त्यांच्या सुटकेविषयी त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आलीय, असंही त्यांनी म्हटलंय.  

यापूर्वी ओमान चंडी यांनी या नर्सेसना इरबिल विमानतळावर हलवण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यांनी आपापल्या कुटुंबीयांशीदेखील फोनवर संपर्क साधून दहशतवादी आज त्यांना सोडणार असल्याचं कळवलं होतं. नर्सेसना आणण्यासाठी दुबई, मुंबई आणि दिल्लीमध्ये विमानं तयार आहेत.  

काही दिवसांपूर्वी, इराकच्या तिकरितहून केरळच्या नर्सेसच्या एका गटाला दहशतवाद्यांनी मोसूलमध्ये एका हॉस्पीटलजवळच्या जुन्या इमारतीत घेऊन गेले. नर्सेस सुरक्षित असल्याची माहिती एका नर्सच्या कुटुंबानं दिली होती. एका गोदामासारख्या हॉलमध्ये त्यांना ठेवण्यात आलंय... इथं वीजही नाही परंतु, त्यांना चांगल्या पद्धतीनं वागणूक दिली जातेय, असं एका नर्सच्या आईनं दिली होती. ‘मोबाईल फोनची बॅटरी चार्ज नसल्यामुळे नीट बोलता आलं नव्हतं... पण, फोन आला नाही तरी काळजी करून नका... इथं बॅटरी चार्ज करण्याची सुविधा नाही’ असंही आपल्या मुलीनं आपल्याला कळवल्याचं शोभा यांनी म्हटलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.