बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक पार पडली. भारताकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव आणि पाकिस्तानचे नसीर खान या बैठकीत सहभागी होते.
चार तास झालेल्या या चर्चेत जम्मू-काश्मीरसह दहशतवादासारख्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला होता. पॅरिसमध्ये झालेल्या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात भेट झाली होती. या भेटीच्या सहा दिवसानंतरच ही बैठक पार पडली.
या बैठकीत भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमदही उपस्थित होते. या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त परिपत्रक जारी केले. 'भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांमध्ये पॅरिसमध्ये झालेल्या भेटीनंतर दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी बँकॉकमध्ये बैठक घेतली. त्याच्यासह दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिवही उपस्थित होते. या चर्चेत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता यासह दहशतवाद, शांतता आणि सुरक्षितता, जम्मू-काश्मीरसह अन्य मुद्दयांचा समावेश होता,' अशी माहिती परिपत्रकाद्वारे देण्यात आली.
यापूर्वी काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांच्या भेटीवरुन भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक होऊ शकली नाही. दोन्ही देशांना सोयीस्कर व्हावे यासाठी त्रयस्थ ठिकाणी ही बैठक ठेवण्यात आल्याचे यावेळी सूत्रांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.