कूच बिहार / नवी दिल्ली : भारत आणि बांग्लादेश दरम्यान तब्बल १६२ एन्क्लेव्हची अदला-बदलीचा करार शुक्रवारी मध्यरात्रीपासून प्रभावित झाला. भारतानं या दिवसाला 'ऐतिहासिक दिवस' म्हटलंय. भाराताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जो मुद्दा वादात सापडला होता, त्यावर तोडगा मिळाल्याचं म्हटलं जातंय.
या निमित्तानं कोणत्याही अधिकृत कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं नाही. पण, 'भारत बांग्लादेश एन्क्लेव्ह एक्सचेंज कोऑर्डिनेशन कमिटी' नावाच्या संघटनेनं कूच बिहारच्या मासलदांगा एन्क्लेव्हमध्ये शुक्रवारी रात्री एका सोहळ्याचं आयोजन केलं होतं. रात्री १२.०१ वाजता उत्साहात लोकांनी राष्ट्रीय ध्वज फडकावला.
दिल्लीमध्ये परदेश मंत्रालयानं ३१ जुलै भारत आणि बांग्लादेश या दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक दिन असल्याचं म्हटलंय. यावेळी, भारतानं ५१ एन्क्लेव्ह बांग्लादेशाला हस्तांतरीत केलेत तर शेजारी बांग्लादेशानं जवळपास १११ एन्क्लेव्ह भारताकडे सुपूर्द केलेत.
बांग्लादेश आणि भारत १९७४ चा एलबीए करार पुन्हा लागू करणार आहेत. सप्टेंबर २०११ च्या प्रोटोकॉल येत्या ११ महिन्यांत योजनाबद्ध पद्धतीनं लागू करण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६-७ जून २०१५ च्या ढाका दौऱ्यादरम्यान भूमि सीमा करार आणि प्रोटोकॉलला अंतिम रूप देण्यात आलं होतं.
यानंतर भारत आणि बांग्लादेशच्या एन्क्लेव्हमध्ये राहणाऱ्या लोकांना संबंधित देशाची नागरिकता तसंच नागरिकांना मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळतील.
मिळालेल्या माहितीनुसार, बांग्लादेशातील भारतीय एन्क्लेव्हमध्ये जवळपास ३७,००० लोक राहतात तर भारतातील बांग्लादेशी एन्क्लेव्हमध्ये १४,००० लोक राहत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.