उनलबटोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियावर कृपादृष्टी दाखवत १ अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे. चीन दौरा आटपून मोदी मंगोलियात दाखल झाले.
सुरक्षा, सायबर सुरक्षा, उर्जा अशा विविध मुद्यांवरील १४ करारांवर दोन्ही देशांनी रविवारी स्वाक्षरी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या परदेश दौ-यावर असून पहिल्या टप्प्यात मोदींनी चीनचा दौरा केला होता. चीननंतर मोदी मंगोलियात दाखल झाले आहेत.
चीन आणि मंगोलिया यांच्यात वैमनस्य असून मंगोलियात जाणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. मंगोलियात संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनी आर्थिक क्षमता आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारत मंगोलियाला एक अब्ज डॉलर्सची मदत करेल अशी घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेनंतर मोदींनी मंगोलियाच्या संसदेलाही संबोधित केले.
भारत व मंगोलिया हे अध्यात्मिक दृष्ट्या एकमेकांच्या जवळ असूनही त्यातुलनेत दोन्ही देशांमधील आर्थिक हितसंबंधांमध्ये फारशी वाढ झालेली नाही. पण आता या दोन्ही देशांनी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य वाढवायची गरज आहे असे मोदींनी सांगितले.
गौतम बुद्धांची विचारधारा आणि लोकशाहीच्या आधारे भारत आणि मंगोलिया आशियामध्ये शांतता, मैत्री, बंधूत्व व सहकार्याची भावना निर्माण करु शकतील असेही त्यांनी म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.