सीरियानंतर आता उत्तर कोरियावर अमेरिकेचा निशाणा?

अमेरिकेनं सीरियावर केलेल्या लष्करी कारवाईनंतर आता उत्तर कोरियाचा नंबर लागतो की काय? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागलीय. उत्तर कोरियाचा अणुकार्यक्रम थांबवणं आवश्यक असल्याचं वारंवार सांगूनही त्या देशाचे हुकूमशाह बधलेले नाहीत. त्यामुळे दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेच्या युद्धनौका कोरियन प्रदेशात दाखल झाल्यामुळे तणाव आणखी वाढल्याचं चित्र आहे.

Updated: Apr 11, 2017, 10:12 PM IST
सीरियानंतर आता उत्तर कोरियावर अमेरिकेचा निशाणा? title=

नवी दिल्ली : अमेरिकेनं सीरियावर केलेल्या लष्करी कारवाईनंतर आता उत्तर कोरियाचा नंबर लागतो की काय? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागलीय. उत्तर कोरियाचा अणुकार्यक्रम थांबवणं आवश्यक असल्याचं वारंवार सांगूनही त्या देशाचे हुकूमशाह बधलेले नाहीत. त्यामुळे दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेच्या युद्धनौका कोरियन प्रदेशात दाखल झाल्यामुळे तणाव आणखी वाढल्याचं चित्र आहे.

अमेरिकेच्या 'कार्ल विन्सन' हा युद्धनौकांचा ताफा ऑस्ट्रेलियाला जाता जाता कोरियन प्रदेशाकडे वळवण्यात आलाय. अमेरिका आणि कोरियाच्या नौदलांच्या संयुक्त सरावांसाठी या युद्धनौका कोरियाकडे वळवण्यात आल्याचं सांगण्यात येत असलं, तरी हा उत्तर कोरियाला थेट इशारा मानला जातोय. उत्तर कोरियाचा एकमेव ताकदवान सहकारी असलेल्या चीननं त्या देशाच्या अणुकार्यक्रमाला आळा घालावा, अन्यथा अमेरिकेला हस्तक्षेप करावा लागेल, असं अमेरिकन अधिकाऱ्यांनीही जाहीर केलंय. 

अमेरिकेच्या या कृतीमुळे उत्तर कोरियाचा मात्र तिळपापड झालाय. कोणत्याही आततायी कृतीला जशास तसं उत्तर देण्यास आपण समर्थ असल्याची दर्पोक्ती उत्तर कोरियाच्या हुकूमशाही राजवटीनं केलीय. 'कार्ल विन्सन हा युद्धनौकांचा ताफा कोरियन प्रदेशात आणून बेजबाबदार अमेरिकेचा आपल्या देशात घुसखोरीचा प्रयत्न प्रकर्षानं दिसलाय. आम्ही शांततेसाठी कधीही भीक मागणार नाही. आत्मसंरक्षणासाठी आम्ही कितीही शक्तिवान घुसखोरांवर योग्य ती कारवाई करू आणि आमच्या मार्गावर चालत राहू, असं उत्तर कोरियाचा हुकूमशहा नेता किंग जोंग यांनी म्हटलंय.  

उत्तर कोरियाचे संस्थापक किम सूंग यांच्या 105व्या जयंतीनिमित्त राजधानी पियॉनगॅन इथं लष्करानं जोरदार संचलन करत आपल्या ताकदीचं प्रदर्शन केलं. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपलं लष्कर सज्ज असल्याचं लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

या घडामोडींमुळे दक्षिण कोरियाही सावध झालाय. काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष वाँग क्यो आन यांनी आपल्या लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश दिलेत. उत्तर कोरिया अधिक आक्रमकता दाखवत अणुचाचण्या करण्याची शक्यता आहे. लष्कर, परराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांनी अमेरिका आणि आपल्या लष्करी सहकाऱ्यांच्या मदतीनं सज्ज रहायला हवं, असं वाँग यांनी म्हटलंय. 

सीरियाच्या हवाईतळावर क्षेपणास्त्रांचा हल्ला चढवून आपण काय करू शकतो, हे ट्रम्प यांच्या अमेरिकेनं जगाला दाखवून दिलंच आहे... सीरियानंतर आता उत्तर कोरियाचा नंबर लागतो की काय, याची चिंता जगाला आहे. उत्तर कोरियाच्या हुकूमशाहाविरुद्ध अमेरिकेनं अशी काही आगळीक केली तर ती जास्त चिंतेची बाब असेल. कारण अमेरिकेचा प्रतिकार करण्याची सीरियाची ताकद नाही, हे सर्वांनाच माहित आहे. पण उत्तर कोरियाचं बळ नेमकं किती आहे, याचा अंदाज कुणालाच नाही. शत्रूची खरी ताकद माहित नसणंही धोकादायकच...