NSG च्या भारतीय सदस्यत्वात चीनचा खोडा, अमेरिकेचे जोरदार लॉबिंग

NSG च्या भारतीय सदस्यत्वात चीनने खोडा घातला आहे. एनपीटीवर सही केल्याशिवाय पाठिंबा देणार नाही, असं सांगत चीनने स्पष्ट नकार दिलाय.

PTI | Updated: Jun 24, 2016, 12:00 PM IST
 NSG च्या भारतीय सदस्यत्वात चीनचा खोडा, अमेरिकेचे जोरदार लॉबिंग title=

सेऊल : NSG च्या भारतीय सदस्यत्वात चीनने खोडा घातला आहे. एनपीटीवर सही केल्याशिवाय पाठिंबा देणार नाही, असं सांगत चीनने स्पष्ट नकार दिलाय.

अमेरिकेचा पाठिंबा पण...

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपच्या शिखर परिषदेच्या बैठकीचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. भारताला या समूहाचं सदस्यत्व मिळावं, अमेरिकेनंही जोरदार लॉबिंग सुरू केलंय. पण चीननं आपली आडमूठी भूमिका सोडलेली नाही. जोपर्यंत अणस्त्र प्रसारबंदी करारावर सही केल्याशिवाय भारत आणि पाकिस्तान यापैकी कुणालाही पाठिंबा देणार नाही, असं चीननं स्पष्ट केले आहे. 

भारताच्या प्रयत्नांना धक्का

न्यूक्लिअर सप्ल्यार्स ग्रुपमध्ये सामील होण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीनच्या या भूमिकेनं मोठा धक्का बसणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदींनी आपली सारी ताकद पणाला लावली आहे.

काल रात्री उशिरा संपलेल्या पहिल्या दिवसाच्या चर्चेत आणखी पाच देशांनी भारताच्या सदस्यत्वाला विरोध केल्याचं वृत्त पीटीआयनं दिले आहे. रात्री उशिरा दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलचा विरोध शमवण्यात भारताला यश आल्याचंही काही वृत्तसंस्थांचं म्हणणं आहे. 

भारताला या देशांचा पाठिंबा

काल दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यांशी चर्चा केली. चीननं भारताच्या सदस्यत्वाकडे सकारात्मक दृष्टीनं बघावं असा आग्रह सुद्धा धरला. पण चीनकडून कुठलही ठोस आश्वासन मिळालं नाही. त्यामुळे आता आजच्या बैठकीकडे सर्वाचं लक्ष लागलंय. भारताच्या सदस्यत्वाला अमेरिका, फ्रान्स, जपान, ब्रिटन, स्वित्झर्लंडसह अनेक देशांचा पाठिंबा आहे, ही बाब आजच्या बैठकीत महत्वाची ठरणार आहे.