मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अटकेवर, राष्ट्रवादीचे नेते आणि समीर भुजबळ यांचे काका छगनराव भुजबळ यांची प्रतिक्रिया आली आहे. "प्रकरण दिसतं तसं सरळ नाही, किरिट सौमय्यांनी उगीच बाऊ केला", अशी पहिली प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. एका कार्यक्रमासाठी छगन भुजबळ सध्या अमेरिकेत असल्याचं सांगण्यात येतंय.दरम्यान समीर भुजबळ यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांना ईडीने अटक केली असल्याची बातमी पीटीआयने दिली आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
दरम्यान यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ कुटुंबियांसमोरच्या अडचणी वाढतच चालल्यात. हायकोर्टानं नुकतंच तपास यंत्रणांना कारवाईबाबत कडक सूचना केल्यात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासमोरील अडचणी संपण्याची काही चिन्हेच दिसत नाहीत. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर ईडीनं पुन्हा छापे घातले होते.
भुजबळांच्या घर आणि कार्यालयांसह नऊ ठिकाणी छापे घातले आहेत अशी माहिती भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिलीय होती. भुजबळांना अटक अटळ असल्याचंही सोमय्यांनी सांगितलंय.
समीर आणि पंकज भुजबळ यांनी कोणत्या जेलमध्ये जावं ते त्यांनी ठरवावं असा टोलाही सोमय्यांनी यावेळी हाणला. दोन दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचलनालयानं छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांना नोटीस बजावली होती.