अमेरिकेतील श्रीमंत बिल गेट्स

अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा बाजी मारली आहे. आपण श्रीमंतीत बलाढ्य असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी हा मान सलग १९ व्या वर्षी पटकावला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 20, 2012, 02:16 PM IST

www.24taas.com,वॉशिंग्टन
अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा बाजी मारली आहे. आपण श्रीमंतीत बलाढ्य असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी हा मान सलग १९ व्या वर्षी पटकावला आहे.
`फोर्ब्स` मासिकाने आज अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली. ४०० अब्जाधीश नागरिकांच्या यादीत बिल गेट्स पहिल्या स्थानावर राहिले आहेत. बिल गेट्स यांच्या संपत्तीत यावर्षी सात अब्ज अमेरिकन डॉलरची वाढली आहे.
श्रींमंतीच्या यादीत भारतीय वंशाच्या पाच अमेरिकी नागरिकांचाही समावेश आहे. यामध्ये सिलिकॉन व्हॅलीतील भांडवलदार विनोद खोसला, सिंटेल आय़टी कंपनीचे संस्थापक भरत देसाई, सिंफनी टेक्नॉलॉजी ग्रुपचे संस्थापक रोमेश वाधवानी, गुगलच्या संचालक मंडळातील सदस्य कवितर्क राम श्रीराम आणि `५ अवर एनर्जी` या कंपनीचे संस्थापक मनोज भार्गव यांच्या नावाचा समावेश आहे.
बिल गेट्स यांची एकूण संपत्ती ६६ अब्ज डॉलर एवढी झाली आहे. यानंतर बर्कशायर हॅथवे कंपनीचे मालक वॉरेन बफे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांच्याकडे ४६ अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. तर ओरॅकल कार्पोरेशनचे लॅरी एलिसन तिसऱ्या स्थानावर असून, त्यांच्याकडे ४१ अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. एलिसन यांची यावर्षीची कमाई ८ अब्ज डॉलर एवढी सर्वांपेक्षा जास्त आहे.
भारतीय वंशाचे देसाई हे २३९ व्या स्थानावर असून, त्यांच्याकडे २ अब्ज डॉलर संपत्ती आहे. वाधवानी १.९ अब्ज डॉलर संपत्तीसह २५० व्या स्थानी, श्रीराम १.६ अब्ज डॉलर संपत्तीसह २९८ स्थानी, मनोज भार्गव १.५ अब्ज डॉलर संपत्तीसह ३११ व्या स्थानी आणि खोसला १.४ अब्ज संपत्तीसह ३२८ वे स्थान पटकावले आहे.