www.24taas.com,इस्लामाबाद
पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप झालाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाकिस्तान पीपल्स पार्टीचा प्रमुख नेता बिलावल झरदारी यांने पाकिस्तान सोडलेय. वडिल असिफ अली झरदारी यांच्याशी न पटल्याने बिलावलने पाकिस्तानला बाय केलाय.
पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) कामकाजावरून बिलावल भुत्तो-झरदारी आणि त्याचे वडील, पाकिस्तानचे राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांचे बिनसले आहे. राजकीय मुद्द्यावरून असिफ अली झरदारी आणि बहीण फरयाल तालपूर यांच्यासोबत बिलावलचे मतभेद झाले आहेत.
दहशतवादी हल्ल्यांबाबत पीपीपीची मवाळ भूमिका असल्याचे मत बिलावलने व्यक्त केले आहे. जनाधार मिळविण्यासाठी अशा हल्ल्यांवर जोरदार टीका करायला हवी, असे त्याला वाटते. त्याने प्रस्तावित केलेल्या काही उमेदवारांना फरयाल तालपूर यांनी सिंध प्रांतातून उमेदवारी न दिल्यामुळेही बिलावल नाराज आहे. यासंदर्भात त्याने झरदारी यांच्यासोबत चर्चा केली होती. परंतु, झरदारी यांनी तालपूर यांची बाजू घेतल्याने बिलावल दुखावला गेला आहे.
याआधीच बिलावलला पीपीपीच्या अध्यक्षपदी बसविण्यात आले होते. आगामी सार्वत्रिक निवडणुकीतील प्रचारात बिलावल प्रामुख्याने भाग घेणार होता. आता तो दुबईला निघून गेल्याने निवडणूक प्रचारावर परिणाम होण्याची शक्यकता वर्तविली जात आहे.